व्यापारी ,पर्यटक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त
माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून विविध ठिकाणी लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक पावसाने वाहून गेल्याने रस्त्यांची गटारे झाली आहेत. धुळविरहीत रस्त्याला एकमेव पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी स्थानिकांच्या मागणी नुसार सनियंत्रण समितीने रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यास परवानगी दिल्याने इथे धुळीचे प्रमाण काहीअंशी का होईना कमी झाले आहे. तर नेहमीच विकासाला विरोध करणाऱ्या राजकीय वरदहस्त असलेल्या मंडळींना मुळातच हे क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते नकोशे वाटतात.एकीकडे याच क्ले ब्लॉकच्या रस्त्याचा वापर सुध्दा करायचा आणि विरोधी भूमिका पण घ्यायची अशा परिस्थितीत गावाचा विकास खुंटत चालला आहे. काही ठिकाणी जुन्या क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे प्रवास करताना पर्यटकांना,नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नवीन ब्लॉक लावण्यास सध्यातरी कोर्टाने बंदी घातली आहे त्यामुळे जुने ब्लॉक लावून रस्ते पूर्ववत करावेत नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच ही रस्त्यांची महत्वपूर्ण अत्यावश्यक सुविधा पूर्णत्वास न्यावी जेणेकरून याचा पर्यटनावर विपरीत परिणाम होणार नाही अशी मागणी स्थानिक तसेच व्यापारी वर्गातून केली जात आहे.
——————————————————-
हुतात्मा भाई कोतवाल नावाने नगरपरिषदेने शॉपिंग मार्केट बनविले स्टेशन परिसरात गजबजलेल्या परिसरात हे मार्केट असून नगरपरिषदेने प्रथम ह्याच रस्त्याला क्ले पेव्हर ब्लॉकचा पायलट प्रोजेक्ट बनवला होता. पण आज त्या रोडची अतिशय खराब परिस्थिती झाली आहे ह्या रस्त्यावरूनच महत्वाच्या भागात जाण्यासाठी सततची रहदारी सुरू असते. पण नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे कित्येक पर्यटक अपघात होऊन जखमी झाले आहेत. तरीही हा रस्ता अनेक महिन्यांपासून दुरुस्त केला जात नाही ह्या रस्त्याला ज्या हुतात्म्यांचे नाव दिले आहे त्यांच्या नावाची तरी कदर करून हा रस्ता दुरुस्त करण्याची तसदी घ्यावी.
प्रदिप घावरे— माजी नगरसेवक
00000
