राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या भिरकावल्या
मराठा आंदोलकही आक्रमक
बीड : मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता उध्दव ठाकरेंचे शिवसैनिक आरक्षणावरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच भिडले आहेत. राज ठाकरे यांचा सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. हाच धागा पकडत आज बीड शिवसेनेच्या वतीने राज मराठा आंदोलकांसह राज ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. आणि सुपीरीबाज राज ठाकरेंच्या घोषणा देत ताफ्यावर सुपाऱ्याही भिरकावण्यात आल्या.
यापुर्वी धाराशिव जिल्ह्यातही मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसेच, राज ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजीही केली होती. आता बीडमध्ये मराठा आंदोलक आणि शिवसैनिकांनी राज ठाकरेंविरोधात हे आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना बाजूला घेतलं. ”लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आलाय. मनोज जरांगे पाटलांचा सुंदर आंदोलन सुरू आहे, त्यास तुम्ही विरोध करता. त्यामुळे, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय,” अशी प्रतिक्रीया बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर यांनी दिली. यावेळी चले जाव, सुपारी बहाद्दर चले जाव, तसेच, एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाही शिवसैनिक व मराठा बांधवांनी दिल्या.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांकडून बीडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जालना रोड परिसरात अडीच क्विंटल फुलाच्या हाराने जेसीबीच्या माध्यमातून स्वागत झाले. राज ठाकरे आज आणि उद्या दोन दिवस बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. राजकीयदृष्ट्या बीड जिल्हा अतिशय महत्वाचा आहे. याच जिल्ह्यात मनसे आपली राजकीय ताकद वाढू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत होती. मात्र विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून एकला चलोचा नारा दिला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा राज ठाकरे आज घेणार आहेत.
