कुस्तीत अमन शेरावतला ब्राँझ
संदीप चव्हाण
पॅरिस : अवघ्या भारताचे लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेकीत भारताच्या नीरज चोप्राने एतिहासिक कामगिरी करीत भारताला सिल्व्हर मेडल जिंकून दिले. ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड आणि सिल्व्हर मेडल जिंकून देणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. तर कुस्तीमध्ये भारताच्या अमन शेरावतने ५७ किलो वजनी गटात भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिले. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधिल भारताची मेडल संख्या आता सहा झाली आहे. यात एक रौप्य, आणि पाच ब्राँझ मेडलचा समावेश आहे.
भालाफेकीच्या फायनलमध्ये नीरज चोप्राची सुरुवात काहीशी अडखळत झाली. सहा प्रयत्नांपैकी त्याचे पाच प्रयत्न अपात्र ठऱले. एकच प्रयत्न जो पात्र ठऱला त्यात त्यानें यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम अशी ८९.४५ मीटरची कामगिरी नोंदविली. पण ती गोल्ड मेडलमिळवण्यास पुरेशी ठरली नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर नव्या ऑलिम्पिक विक्रमाची नोंद करीत गोल्ड मेडल जिंकले. नीरजला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य पदक ठरले. ब्राँझ मेडल ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.५४ मीटरची भालाफेक करीत मिळवले.
नीरज हा दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सुशील कुमार, पीव्ही सिंधू आणि मनू भाकर यांनी हे काम केले होते. नीरजने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून दिले होते.
रौप्यपदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. “गोल्ड मेडल जिंकण्यसाठीच प्रयत्न केला होता. पण सिल्व्हर जिंकलो. देशाला मेडल जिंकून दिले याचा मला खूप आनंद होत आहे. खेळ संपलेला नाही, खूप काही बाकी आहे. बऱ्याच काळापासून मी दुखापतीचा सामना करतो आहे. दुखापतीमुळे जेवढ्या स्पर्धा खेळायला हव्यात तेवढ्या मी खेळू शकत नाहीये. दुखापतीमुळे मला माझ्या चुकांवर काम करता येत नाहीये. या चुकांवर काम झाल्यास चांगला परिणाम दिसेल अशी प्रतिक्रीया नीरजने दिली.
दरम्यान पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमन शेरावतने भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिले. अमनने ब्राँझ मेडलच्या मॅचमध्ये पुर्तोरिकोच्या क्रुझ डॅरिएन तोईचा १३-५ असा गुणांवर पराभव केला. अमनने ऑलिम्पिकच्या निवडचाचणीत टोकीयोतील सिल्व्हर मेडेलिस्ट विजय दहीयाला पराभूत करून पॅरिस ऑलिम्पिक गाठले होते. आज त्याने मेडल जिंकत आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
भारताने यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत १ सिल्व्हर मेडेल, शुटींगमध्ये २ ब्राँझ, हॉकी आणि कुस्तीत प्रत्येकी १ ब्राँझ मेडेल जिंकले आहे.
कुस्तीत विनेश फोगट ५० किलो वजनी गटात बाद झाली नसती तर भारताचे एक मेडेल पक्क होते. आजवर भारताने टोकीयो ऑलिम्पिकध्ये सर्वाधिक सात मेडेल जिंकली होती. कुस्तीमध्ये महिलांच्या ७६ किलो वजनी गटात भारताची रितीका क्वार्टर फायनलला पोहचली आहे. शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता तीची मॅच असेल. तसेच भारताचे गोल्फमधिल आदीतीचे आव्हान अजून कायम आहे.
