डाव्यांनी झापडबंदच असले पाहिजे, कामगारांच्या हिताचा त्यांनी विचार केला पाहिजे, उद्योजकांचे हीत आणि त्यांना पायघड्या घालायची काहीच गरज नाही, अशी मानसिकता पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील डाव्यांची होती. उद्योगच आले नाही, तर कामगारांना रोजगार कसा मिळेल, एवढा तारतम्याचा विचार करण्याची त्यांची तयारी नव्हती. डाव्यांत कुणी वेगळा मार्ग चोखाळला, तर त्यांची संभावना भारतातील डावे मिखाईल गोर्बाचेव्ह किंवा डेंग अशी करीत. ती शिवी वाटत असली, तरी अशी भूमिका घेणाऱ्या नेत्याचा तो गौरव होता, हे त्यांच्या लक्षात कधीच आले नाही. तत्व जपताना राज्याच्या हितालाही प्राधान्य दिले पाहिजे, असे करताना त्याची किंमत मोजावी लागते. त्यात गुरुवारी निधन झालेल्या बुद्धदेव भट्टचार्य यांचा समावेश होतो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी ८० व्या वर्षी कोलकाता येथील बालीगंज येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. ते पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतनासोबत पाम एव्हेन्यूवरील दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होते. बुद्धदेव यांना पश्चिम बंगालला ‘जगातील सर्वात स्वस्त कार’ देऊन औद्योगीकीकरणाच्या युगात घेऊन जाण्याची इच्छा होती; परंतु या मोहिमेत त्यांच्या पक्षाला सोबत घेण्यात त्यांना अपयश आले. लेखक-राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. २००० मध्ये ते राष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आले. भारतात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या ज्योती बसू यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले, त्या वेळी त्यांची जास्त चर्चा झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २००१ मध्ये सत्ताधारी माकपच्या नेतृत्त्वाखालील डाव्या आघाडीने २९४ विधानसभा जागांपैकी १९९ जागांवर दणदणीत विजय मिळवला. २००६ च्या निवडणुकीत बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा २३५ जागा जिंकून पक्षाने जागा वाढवल्या. बुद्धदेव यांनी मुख्यमंत्रिपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात औद्योगीकीकरणाची मोहीम सुरू केली. डाव्या विचारसरणीच्या नेत्यासाठी ही एक नवीन, वेगळी आणि सुधारणावादी भूमिका होती. औद्योगीकीकरणाच्या मोहिमेला डाव्या नेत्यांचा तीव्र विरोध होता. या मोहिमेमध्ये त्यांनी आयटी आणि आयटीईएस (माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा) क्षेत्रात मोठी गुंतवणूक, सालबोनी येथील देशातील सर्वात मोठा एकात्मिक स्टील प्लांट, नयाचार येथील केमिकल हब, नंदीग्राम येथील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि सिंगूर येथील नॅनो प्लांट यांचा समावेश केला. तथापि ‘सेझ’ आणि सिंगूरच्या प्रकल्पांनी भट्टाचार्य यांचे मोठे राजकीय नुकसान केले. २००६ मध्ये, टाटा मोटर्सला हुगळी जिल्ह्यातील सिंगूरमध्ये नॅनो बनवण्यासाठी आणि २००७ मध्ये नंदीग्राममधील ‘सेझ’साठी जमीन संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांची निदर्शने आंदोलनात बदलली. सरकारविरोधी लाट आली. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या निदर्शनांनी शेवटी सरकारविरोधी आंदोलनाचे रूप धारण केले. राज्यात सीपीआय(एम) विरुद्ध एकहाती लढा देणाऱ्या ममतांनी डाव्यांवर हल्ला करण्याची ही संधी साधली. तोपर्यंत डाव्या पक्षाची बंगालमध्ये ३४ वर्षे सातत्याने सत्ता होती आणि हा पक्ष प्रचंड सत्ताविरोधी लाटेचा सामना करत होता. १४ मार्च २००७ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १४ आंदोलकांचा मृत्यू झाल्याने लोकांचा संताप आणखी भडकला.
एका वर्षानंतर, टाटांचा नॅनो प्लांट गुजरातला हलवण्याचा निर्णय बुद्धदेव भट्टाचार्य सरकारसाठी मृत्यूची घंटा ठरला. अशा परिस्थितीत नंदीग्राममधील ‘एसईझेड’ही ‘टेक ऑफ’ करण्यात अपयशी ठरले. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने डाव्यांची सत्ता संपवली आणि ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या. बुद्धदेव भट्टाचार्य हे त्यांच्याच जादवपूर या जागेवर तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांच्या सरकारमध्ये मुख्य सचिव असलेल्या मनीष गुप्ता यांच्याकडून निवडणूक हरले. यानंतर बंगालमध्ये डाव्यांच्या पराभवासाठी त्यांना सहज बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न झाला. बुद्धदेव यांनी २०१३ मध्ये एका मुलाखतीत औद्योगीकीकरणावर भर का दिला, हे सांगितले होते. “पश्चिम बांगला जोडी कोई कारखाना ना हो, चेले मायेरा अज जरा कॉलेज ए पोरचे, इंजिनियरिंग कॉलेज पोरचे तदेर भोबिस्यत ता की?’‘याचा अर्थ बंगालमध्ये उद्योग नसतील, तर सध्या कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींच्या भवितव्याचे काय होईल? हा सीपीएम किंवा तृणमूलचा मुद्दा नाही. बुद्धदेव यांनी नंदीग्राममधील मृत्यूंबाबत दुःख व्यक्त केले होते. पोलिसांकडे काही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, “जबाबदार सरकारला जे काही करण्याची गरज होती, ते तिथे केले गेले. हे कोणतेही सरकार करेल. कायद्याचे राज्य कोलमडले होते; पण गोळीबार झाला नसता तर बरे झाले असते.’’ बुद्धदेव यांनी १९६६ मध्ये माकपचे प्राथमिक सदस्य म्हणून कामाला सुरुवात केली. काँग्रेस सरकारच्या काळात दुष्काळसदृश परिस्थितीविरुद्ध पक्षाच्या अन्नसुरक्षा आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. नंतर ते माकपच्या युवा शाखा ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन’चे राज्य सचिव बनले. नंतर ही संघटना ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’मध्ये विलीन झाली. १९७२ मध्ये त्यांची राज्य समितीवर निवड झाली आणि १९८२ मध्ये ते राज्य सचिवालयाचा भाग बनले. पहिली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर लगेच भट्टाचार्य यांना मंत्री करण्यात आले. भट्टाचार्य यांनी १९७७ ते १९८२ पर्यंत माहिती आणि जनसंपर्क मंत्री म्हणून काम केले. १९८२ मध्ये कोसीपूर मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर भट्टाचार्य जाधवपूर विधानसभा मतदारसंघात गेले आणि १९८७ पासून २०११ पर्यंत जिंकले. १९८७ मध्ये त्यांना ज्योती बसू मंत्रिमंडळात माहिती आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले. १९९३ मध्ये बसू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला; परंतु काही महिन्यांनंतर ते पुन्हा सत्तेत सामील झाले.
बसू यांच्याच मंत्रिमंडळात १९९६ मध्ये ते गृहमंत्री झाले आणि १९९९ मध्ये बसू आजारी पडल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. बसू यांनी पद सोडल्यानंतर, भट्टाचार्य यांनी २ नोव्हेंबर २००० रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. २००२ मध्ये त्यांची पक्षाच्या पॉलिट ब्यूरोवर निवड झाली. भट्टाचार्य यांनी राज्यातील सर्वोच्च पद भूषवले; परंतु त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना कोलकाता येथील बल्लीगंज येथे दोन खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. कुटुंब आजही त्याच घरात राहते. संस्कृती आणि साहित्यात खोलवर रुची असलेल्या भट्टाचार्य यांनी आठ पुस्तके लिहिली. राजकीय व्यक्तिमत्त्वापेक्षा ते संस्कृती आणि साहित्यात बुडालेले गृहस्थ होते. राज्य सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘नंदन’ या संस्कृती आणि चित्रपट केंद्राशी त्यांचे विशेष नाते होते. ‘नंदन’ने १९९५ पासून सतत कोलकाता चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही भट्टाचार्य बहुतेक संध्याकाळी ‘नंदन’मध्ये त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या खोलीत बंगाली साहित्यिकांशी संवाद साधताना दिसायचे. त्यांनी लिहिलेल्या साहित्य कृतीत कोलंबियन लेखक गॅब्रिएल गार्सिया मार्केझ आणि रशियन कवी व्लादिमीर मायाकोव्स्की यांच्या कृतींचाही समावेश आहे. बंगालमध्ये डाव्यांची सत्ता गेल्यानंतर त्यांनी माकपच्या राजकारणातून रस कमी केला.
ते काही काळ राज्यात सक्रिय असले, तरी पक्षाच्या राष्ट्रीय बैठकांमध्ये ते सहभागी होत नव्हते. एप्रिल २०१२ मध्ये, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि दृष्टी कमी झाल्यामुळे, केरळमधील कोझिकोड येथे आयोजित २० व्या पक्ष काँग्रेसमध्ये ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव पॉलिट ब्यूरोमधून मुक्त होण्याची विनंती केली आणि तीन वर्षांनंतर, २०१५ मध्ये, त्यांनी पॉलिट ब्यूरो आणि केंद्रीय समिती दोन्ही सोडले. लोकसभा निवडणुकीच्या २०१९ च्या मेगा रॅलीच्या वेळी त्यांना गाडीतून उतरता आले नाही. आजारपणामुळे बुद्धदेव यांनी २०१८ मध्ये राज्य समिती आणि सचिवालय सोडले. त्यांचे सार्वजनिक दर्शन दुर्मिळ झाले. अलिकडच्या वर्षांत प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते त्यांच्या घरातून बाहेर पडलेच नाही. बुद्धदेव यांनी २०२२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील एक कौतुकास्पद राजकारणी म्हणून पाहिले जात होते. या वर्षी, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या आधी, सीपीआय(एम) ने प्रचारात बुद्धदेव भट्टाचार्य यांचा ‘एआय’ अवतार वापरला. याद्वारे त्यांनी पश्चिम बंगालमधील जनतेला डाव्या आणि धर्मनिरपेक्ष शक्तींना मतदान करण्याचे आवाहन केले. एका पुजारी कुटुंबात जन्म झालेल्या आणि शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू केलेल्या बुद्धदेव यांना कॉम्रेड्स अनेक बाबतीत त्यांच्यापेक्षा वेगळे मानत होते. बुद्धदेव यांच्या पक्षातील काही कॉम्रेडस् त्यांना मार्क्सवादी कमी आणि बंगाली जास्त मानत. त्यांच्या वेशभूषा आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक डावे नेते त्यांना भद्रलोक म्हणत असत. आर्थिक उदारमतवादाची अंमलबजावणी आणि भांडवलशाहीशी जुळवून घेतल्याने काही कॉम्रेड त्यांना ‘बंगाली गोर्बाचेव्ह’ आणि डेंग असेही म्हणत. बुद्धदेव यांना हे सर्व आवडले नाही; मात्र त्यांनी कधीही त्याचा प्रतिवाद केला नाही.
