संदीप चव्हाण

रात तो वक़्त की पाबंद है, ढल जाएगी
देखना ये है चराग़ों का सफ़र कितना है..

पॅरिसमधिल स्टेड दी फ्रान्सच्या अतिभव्य स्टेडियमबाहेर रात्रीच्या अडीज वाजता नीरजशी बोलताना राहून राहून वसीम बरेलींच्या या शायरीची आठवण येत होती… मंद वाहणारा थंड वारा पहाटेची आगाज देत होता. नीरज आणि नदीम यांच्या एतिहासिक यशाने आशियाई पहाट उगवणार होती. पण त्यापुर्वी रात्रीच्या अंधारात या दोघांशी बोलताना काही गोष्टी काळजात सलत होत्या… नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटरच्या ऑलिम्पिक विक्रमासहीत भालाफेक करीत गोल्डमेडल जिंकले, आणि नीरजने सिल्व्हर मेडल. डोप टेस्टचे सोपास्कार करून मीडीयासोबत बाहेर येईपर्यंत मध्यरात्र झाली होती. दिवसभराच्या या धावपळीनंतरही नीरज सगळ्यांशी भरभरून बोलत होता. गोल्ड मेडल गमावल्याचे दुख: मनात होतेच, पण सिल्व्हर मेडल जिंकल्याचा आनंद डोळ्यातून ठिबकत होता. ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणि सिल्व्हर मेडल जिंकणारा भारताचा तो एकमेव खेळाडू ठरलाय. टोकियोत जेव्हा तो मैदानावर उतरला होता, तेव्हा त्याच्यावर कुठलेच दडपण नव्हते. तो जिंकेल असा विश्वास तेव्हा एक नीरज सोडला तर बहुधा कुणालाच नसावा. कारण फायनलमध्ये तेव्हा ९० मीटर पार भालाफेक करणारे तब्बल पाच खेळाडू होते. आणि यंदाही फायनलमध्ये ९० मीटर पार करणारे सहा खेळाडू नीरज समोर होते. नीरजला आजवर कधीही ९० मीटर पार भाला फेकता आलेला नाही. जगातील आकड्यांच्या दृष्टीने तो भलेही आज सर्वश्रेष्ठ नसेल पण सातत्यपुर्ण कामगिरीत त्याने भल्याभल्यांना मागे टाकलेय. जग जिंकण्यासाठी तुम्ही नुसते सर्वश्रेष्ठ असून उपयोगाचे नाही तर तुमच्यात सातत्य असणे सर्वात गरजेचे आहे. नीरज सातत्याच्या बाबतीत सर्वोत्तम आहे. स्वत:ची कामगिरीही त्याने उंचावली आहे. नीरजची आजवरची वैयक्तीक सर्वोत्तम कामगिरी आहे ८९.९४ मीटर. आणि फायनलपुर्वीच्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी होती ८८.३६ मीटर. काल चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या झेक प्रजासत्ताकच्या याकुब वॅडलेचची कामगीरी होती ८८.५० मीटरची. थोडक्यात नीरजसोबत मेडल जिंकण्यासाठी ‘करो की मरो’ची स्थिती होती. वैयक्तीक सर्वोत्तम किंवा वर्षातील सर्वोत्तम कामगिरीशिवाय नीरजपुढे पर्याय नव्हता. नीरजच्या सहा प्रयत्नापैकी पाच प्रयत्न अपात्र होते. एकच प्रयत्न त्याचा पात्र ठरला आणि त्यात त्याने वर्षातील सर्वोत्तम अशी ८९.४५ मीटरची कामगिरी नोंदविली. आणि रौप्यपदकाची कमाई केली.

अवघ्या भारताने त्याचे रौप्यपदक सेलिब्रेट केले. पण टोकीयो ऑलिम्पिकनंतर झालेल्या दुखापतीचे अश्रुत्याने बिलंदरपणे पापण्याआड लपवून ठेवले. त्याच्या मांडीचे स्नायू दुखावले असून त्याला तातडीची शस्त्रक्रीया करणे गरजेचे आहे. पण जागतिक स्पर्धांचे व्यस्त वेळापत्रक आणि ऑलिम्पिक तोंडावर असल्याने त्याने ही शस्त्रक्रीया टाळली होती.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजकांचा विविध स्पर्धात सहभागी होण्यासाठी टोकीयो गोल्ड मेडेलिस्ट असल्याने त्याला आग्रह असायचा. नाही गेला तर आयोजकांना त्यांच्या स्पॉन्सर्सला उत्तर देणे अवघड व्हायचे. खेळ वाढवायचा असेल तर या खेळाचा राजदूत म्हणून त्याला जगभरातील स्पर्धांत सहभागी होणे गरजेचे होते. पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर दुखापतीने खुप उचल खाल्ली होती. त्यामुळे त्याचा रनअपही ठीक होत नव्हता. परिणामी पॅरिस ऑलिम्पिकमधील सहापैकी पाच प्रयत्न असफल झाले होते. जो एकमेव प्रयत्न सफल झाला त्यात जर त्याने वर्षातील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली नसती तर ? नुसता विचार करूनसुद्धा अंगावर काटा येतो. नीरजने मेडल जिंकणे हे त्याच्यापेक्षाही भारताच्या युवापीढीसाठी खुप गरजेचे होते. टोकियोतील गोल्ड हा जॅकपॉट नव्हता तर मेहनतीने मिळालेले यश होते हे पॅरिसमध्ये त्याला सिध्द करायचे होते. नीरज त्यात यशस्वी झाला. पण आपल्या तमाम भारतवासीयांच्या अपेक्षांचे ओझे पेलता पेलता दुखापतीने त्याला कधी घेरले हे त्यालाही कळलेच नाही. कळले तोवर बराच उशीर झालाय. जी स्थिती नीरजची तीच पाकिस्तानच्या गोल्डमेडल विजेत्या नदीम अर्शदची आणि ब्राँझ मेडल विजेत्या ग्रेनेडाच्या पीटर अँडर्सनची. दुखापतींशी झुंजणारे हे तेजोमय सुर्य असेच तळपत राहतील की उद्याच्या अंधारात लुप्त होतील. मनात अनेक प्रश्नांचे वादळ घेऊन नीरजचा निरोप घेतला. जाताना लक्षात होते ते नीरजचे तेच निरागस हास्य… मनाला उभारी देणारे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *