मुंबई : भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून पगारवाढ लागू आहे. आत्तापर्यंत द्विपक्षीय वेतन समितीच्या ७ मिटिंग झाल्या, परंतु कोणतीही सन्माननीय तडजोड झाली नाही, तर गोदी कामगारांची चांगली एकजूट आहे. तेंव्हा गोदी कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्या मिळवण्यासाठी लढ्याची तयारी ठेवा. असे आवाहन अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांचे ज्येष्ठ नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्सच्या जाहीर मेळाव्यात बोलताना केले.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवनिर्वाचित बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, पेन्शनर्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष विजया कुलकर्णी, ट्रान्सपोर्ट डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या लेखा विभागातील पेन्शनचे प्रमुख अधिकारी चौधरी इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. व्यासपीठावर पेन्शनर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डी. एच.डिंगरेजा, सेवानिवृत्त उप मुख्य लेखा अधिकारी श्रीपाद यादवाडकर, मारुती विश्वासराव, बबन मेटे, बापू घाडीगावकर,गिरीश कांबळे,प्रकाश दाते आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन माईकल कोलॅसो यांनी केले तर आभार पेन्शनर्स असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी बी.बी.चिपळूणकर यांनी मानले. सभेला पेन्शनर्सची प्रचंड गर्दी होती.
मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनची ४४ वी वार्षिक सभा ९ ऑगस्ट २०२४ रोजी दादर येथील शिवाजी मंदिर येथे सी. जे. मेंडोसा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ॲड. एस.के. शेट्ये आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनरची सभा अविस्मरणीय आहे. आपल्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. अशी शक्ती असेल तर कामगार चळवळ अधिक मजबूत होईल. मला डॉ. शांती पटेल, एस. आर. कुलकर्णी, अँथोनी पिल्ले अशा कामगार नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मला अनेक पुरस्कार मिळाले परंतु, गोदी कामगारांकडून मिळालेले प्रेम हा माझ्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा पुरस्कार आहे. गोदी कामगार कृतज्ञ आहेत. पेन्शनर्सनी घाबरण्याची काही गरज नाही, जोपर्यंत समुद्रात पाणी आहे तोपर्यंत गोदी कामगारांना पेन्शन मिळत राहील. आता मुंबई पोर्टची आर्थिक स्थिती चांगली होत आहे.जीवनात पैसा आवश्यक आहे, पण समाधान मिळाले पाहिजे, त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ वाचा. जीवनात यशस्वी होण्यासाठी चिकाटी महत्त्वाची आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी.जे. मेंडोसा यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले की, पेन्शन फंडात पाच हजार कोटीची तुट होती, ती तूट आता पाचशे कोटीपर्यंत आली आहे. पेन्शनर्सच्या रोजी रोटीची पोर्ट ट्रस्टने काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. १ जानेवारी २०१७ पासून पेन्शन वाढीसाठी दिलेली दुसरी पद्धत वापरून लवकरात लवकर पेन्शन वाढ करणे. १ जानेवारी २००० ते ३१ डिसेंबर २००६च्या दरम्यान मृत्यू पावलेल्या कामगारांना ७ वर्षे ऐवजी १० वर्ष पेन्शन वाढवून देणे. करारापूर्वी सेवानिवृत्त होऊन मृत्यू पावलेल्या कामगारांच्या विधवांना वाढीव कम्युटेशन पेन्शन वाढ देणे. जानेवारी २००४ पासून सुरू केलेली नवीन पेन्शन योजना बंद करून, एक व्यवस्थापन एक पेन्शन योजना लागू करावी. पेन्शनर्सच्या या महत्त्वाच्या मागण्या असून, पोर्ट प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा, असेही ॲड. एस.के. शेट्ये शेवटी म्हणाले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *