ठाणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय ठाणे मार्फत मधमाशापालन उदयोग वाढीचे काम करण्यात येते. शासनाने प्रत्येक जिल्हयामध्ये मधाचे गाव निर्माण करण्यासाठी शासन परिपत्रक २० फेब्रुवारी २०२४ रोजी पारित केले. त्यानुसार ठाणे जिल्हयात समितीची प्रथम बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे घेण्यात आली.
यावेळी अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सह अध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सदस्य- ठाणे जिल्हा उपवनसंरक्षक सुयश वाघ (प्रतिनिधी), जिल्हा कृषी अधीक्षक बालाजी ताटे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्र, महाव्यवस्थापक (प्रतिनिधी) एस.आर. मानवटकर, अंबरनाथ तहसिलदार, प्रशांती माने, तांत्रिक सदस्य सातारा जिल्हा मधसंचालनालय, महाबळेश्वर चे संचालक आर. पी. नारायणकर, सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश श्रीहरी सुरुंग हे उपस्थित होते.
त्यानुसार ५ ऑगस्टला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली मधाचे गाव समितीची प्रथम सभा संपन्न झाली. या सभेत कल्याण तालुक्यातील “पोई” गावाबाबत चर्चा करण्यात आली. या गावास विविध शासकीय पारितोषिके मिळालेली असून परिसरात फुलवर्गीय पीके व जंगल मोठ्या प्रमाणात असून या गावात भात शेती, भाजीपाला, फुलशेती, तसेच जंगल असून मध उद्योगास अनुकूल वातावरणाबाबत चर्चा करण्यात आली. लोकसहभाग मिळवून या गावाची निवड करण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सभेमध्ये जाहीर केले व या गावचा कृती आराखडा योजनेप्रमाणे करावा, असे निर्देश दिले.
या योजनेमुळे पोई गावास मधाचे गाव दर्जा प्राप्त झाल्यामुळे या गावात पायाभूत सुविधा मध उद्योगाचे प्रचार प्रसिध्दीचे माहितीचे दालन, मध प्रक्रिया केंद्र, सामूहिक मधुबन, मधाच्या गावाचा ब्रँड आदी सुविधा तयार करून पर्यटन पूरक उद्योग उभारणी होणार आहे व शेतीस जोडधंदा मिळून शेती उत्पादनात परागीभवनामुळे वाढ होवून आर्थिक प्रगती व रोजगार निर्मिती या उपक्रमामुळे होणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग यांनी दिली आहे.
0000
