राजीव चंदने

मुरबाड : मुरबाड ते कल्याणच्या खड्डेमय तीस किलोमीटर प्रवासाला बेजार झालेल्या प्रवासी वर्गाच्या तक्रारी संपत नसतांना आता मुरबाड ते माळशेज घाट दरम्यानच्या महामार्गावरील वाढत्या खड्डयांना देखील तोंड द्यावे लागत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील शिवळे, सरळगाव हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या जीवघेण्या खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत असून याचा सर्वाधिक धोका दुचाकी स्वरांना निर्माण झाला आहे. गतिशील वाहनाच्या चाकाखाली अचानक खड्डा येऊन ठेपल्याने वाहन चालकाची होणारी तारांबळ एखाद्या मोठ्या अनपेक्षित हानीला आमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे चालकांना अक्षरशः खो खो खेळत गाडी चालवावी लागत असल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. या वाहतुकीसाठी धोकादायक असणाऱ्या खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात असून याविषयी मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य तथा सरळगाव ग्रामस्थ अ‍ॅड. विष्णू सदाशिव घुडे यांनी ठाणे येथील कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सदर महामार्गाचे काम लवकरात लवकर करण्याबाबत निवेदन देऊन खड्डे तात्काळ भरण्याची अथवा पर्यायी रस्त्याची मागणी केली आहे, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी रास्तारोको करणार असल्याचे निवेदनामधे नमूद केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *