नवी दिल्ली : कोलकाता येथील आणखी एका निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. यावर लोकांचा उद्रेक सोशल मिडियातून व्यक्त होत आहे. अशातच कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. ‘मी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे’, असं राहुल यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ज्याप्रकारे तिच्यावर क्रूर आणि अमानवी कृत्य झालं आहे, त्यामुळे डॉक्टर कम्युनिटी आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करावा लागतोय.
‘या घटनेने विचार करायला भाग पाडलं आहे की, मेडिकल कॉलेजसारख्या ठिकाणी जर डॉक्टरच सुरक्षित नसतील, तर पालकांनी आपल्या मुलींना बाहेर शिकायला पाठवण्यासाठी कसा विश्वास ठेवायचा? निर्भया प्रकरणानंतर बनवलेले कडक कायदेही असे गुन्हे रोखण्यात अयशस्वी का आहेत? हाथरस ते उन्नाव आणि कठुआ ते कोलकातापर्यंत महिलांवरील वाढत्या घटनांवर प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक घटकाला एकत्रितपणे गांभीर्याने चर्चा करून ठोस उपाययोजना कराव्या लागतील. या असह्य दु:खात मी पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. त्यांना प्रत्येक परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना शिक्षा झाली पाहिजे’, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“आम्हाला एकदा तरी मुलीला पाहू द्या”
ट्रेनी डॉक्टरच्या शेजाऱ्यांशी विचारणा केली असतं, त्यांनी जे सांगितलं ते मन हेलावून टाकणारं आहे. “ट्रेनी डॉक्टरचे आई–वडील जेव्हा आम्ही रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला तीन तास तिथे उभं करण्यात आलं. आम्हाला एकदा तरी आमची मुलगी दाखवा अशी पालक हात जोडून विनंती करत होते. पण रुग्णालय प्रशासनाने ऐकलं नाही. त्यानंतर मृत मुलीचा फोटो आणला असता तिच्या तोंडात रक्त आल्याचं दिसले. चष्मा तुटला होता. अंगावर कपडे नव्हते. दोन्ही पायांची अवस्थाही वाईट होती.”
