मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील १७ पोलिसांना शौर्यपदक, उल्लेखनीय सेवेसाठी तीन पोलिसांना, तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने यांनाही शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईत कार्यरत सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हातिस्कर, आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे व दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव रामच्छबिला प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे व पोलीस सहआयुक्त सतीश गोवेकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच राज्यातील अधिकारी व कर्मचारी मिळून ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनाही पदक जाहीर झाले आहेत. धुमाळ १८ वर्ष मुंबईतील खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर संतोष शेट्टी, बंटी पांडे यांच्या अटकेसाठी धुमाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्याशिवाय दत्तात्रय तुळशीदास शिंदे (उपमहानिरीक्षक), संदीप गजानन दिवाण (उपमहानिरीक्षक) व शिवाजी ज्ञानदेव फडतरे (उपमहाधीक्षक) यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद राणे यांनाही ‘गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. राणे यांनी उल्हासनगर, भिवंडी, नवी मंबई व मुंबई येथे कार्यरत असताना आपल्या कामची छाप उमटवली होती. मुंबईत कुर्ला येथील गुन्हे शाखा, ना. म. जोशी मार्ग व आर्थिक गुन्हे शाखेचे हाउसिंग युनीट १ चे येथे ते कार्यरत होते. भिवंडीसारख्या संवेदनशील शहरात काम करताना विविध गणेशोत्सव मंडळे, मशीद व्यवस्थापन यांच्यात समन्वय, नवी मुंबई येथील संवेदनशील अशा जेरोम सलढाणा यांचा खून, मुंबईतील इस्थर अनुहया प्रकरण, नवी मुंबई येथील मन्नपुरम गोल्डच्या दोन कोटींहून अधिक किंमतीच्या सोने दरोड्याची घटना अशा प्रकरणांची उकल त्यांनी केली आहे. आर्थिक गुन्हे विभागात कार्यरत असताना गुंतवणूक योजनांद्वारे फसवणूक झालेल्या पीडित गुंतवणूकदारांना न्यायालयीन कार्यवाहीने ५० कोटी रुपयांहून अधिक रक्कमांचा परतावा देण्याची कार्यवाही त्यांनी केली आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय हातिस्कर यांनाही गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. हातिस्कर रायगड, सिंधुदुर्ग येथे सुरुवात व नंतर १७ वर्ष मुंबई येथे सेवा केली असून रायगड आणि मुंबईतील आरसीएफ, मालाड या पोलीस ठाण्यामध्ये अनेक तपास केलेल्या गंभीर गुन्हामध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. १९९५ तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले अशोक होनमान यांनी नवी मुंबई, ठाणे, पालघर व मुंबई या ठिकाणी काम केले आहे. ते सध्या दहिसर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते पालघर गुन्हे शाखा, भिवंडी गुन्हे शाखा, माणिकपूर पोलीस ठाणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत होते.
