महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती
पनवेल : राज भंडारी
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने पुरण पनवेल मध्ये दंड थोपटले आहेत. यासंदर्भात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिनांक १७ ऑगस्ट रोजी पनवेल मधील वीरूपक्ष मंगल कार्यालय येथे उरण पनवेल महाविकास आघाडी तसेच सिडको बाधित पनवेल महानगरपालिका बाधित प्रकल्पग्रस्त संघटना यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या यलगार परिषदेत लवकरच महामोर्चाच आयोजन करण्यात येणार असून सुमारे महाविकास आघाडीचे दहा हजार कार्यकर्ते तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला.
या पत्रकार परिषदेसाठी पनवेल – उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीच्या उरण विधानसभा अध्यक्षा भावनाताई घाणेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी.घरत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, पनवेल तालुका चिटणीस गणेश कडू, हेमराज म्हात्रे, रिपब्लिकन पार्टीचे महेश साळुंखे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळाराम पाटील यांनी नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावर दिबांचे नाव मिळण्यासाठी आम्ही आग्रही असताना भाजपने राजकारण करून बैठक रद्द झाल्याचे भासवित दुसऱ्या दिवशी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देताना भाजपचे दोन आमदार उपस्थित असल्याबद्दल भाजप कसे राजकारण खेळत आहे त्याचा प्रत्यय आला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात पलावा सिटीमध्ये मालमत्ता कर ५०० स्क्वेअर फुटापर्यंत माफ केला जातो, नवी मुंबई महानगरपालिकेत देखील ५०० स्क्वेअर फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द केला जातो, मग पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांसाठी हा कर रद्द का केला जात नाही ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. नैना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन थांबले नसून काही कालावधीसाठी खंडित झाले होते, मात्र नैनाचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे. नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडी कटिबद्ध राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पनवेलमधील इतिहास पाहिला तर जी विकासकामे झाली आहेत, त्याची रचना जे. एम. म्हात्रे नगराध्यक्ष असताना सन २००९ साली झाली आहेत. तीच कामे गेली १५ वर्षे झाली तरी येथील आमदार आणि त्यांच्या अधिपत्याखाली आलेली तत्कालीन नगरपालिका किंवा मग आताची महानगरपालिका करू शकली नाही. यामध्ये जे.एम.म्हात्रे यांनी विकसित करण्यासाठी उचललेल्या कामांपैकी केवळ एक काम म्हणजे वडाळे तलाव आणि देवाळे तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्येही तलावांचे सुशोभीकरण असेल किंवा मग पनवेलमधील रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण या कामांचे श्रेय हे तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यामुळे झाले हे जनतेला देखील ठाऊक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पनवेल – उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी बोलताना सांगितले की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिक असो किंवा मग सिडको हद्दीतील नागरिकांचे प्रश्न असोत, गेली १५ वर्षे येथील आमदारांना संधी देवून देखील त्यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या गरजेपोटी घरांचे प्रश्न धूळखात पडून ठेवले आहेत. त्यामुळे या अशा ढोंगी भाजपच्या खोट्या अमिषाला आता जनता बळी पडणार नाही. यासाठीच आम्ही पनवेल – उरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त, शेतकरी, सिडकोबधित तसेच पनवेल महानगरपालिका बाधित संघटनांना सोबत घेवून विराट मोर्चा हा पनवेल महानगरपालिकेवर धडकविणार आहोत. तसेच या मोर्चाच्या प्रति संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याच ठिकाणी आम्ही देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर मोर्चाची तारीख ही आज १७ ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या यलगार परिषदेत ठरविली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
