स्वाती घोसाळकर

मुंबई : ‘मुंबई आमच्या सायबांचीनाही कुणाच्या बापाची’ ही शिवसेनेची हक्काची ‘वाघगर्जना ! शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई कुणाची असा सवाल निर्माण झाला होता. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने मुंबईतील लढविलेल्या चार पैकी तीन खासदारकीच्या जागा जिंकल्या आणि त्यापाठोपाठ विधानपरिषदेच्या मुंबईतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील दोन्ही जागा जिंकत मुंबई आमच्या सायबांची… या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. आगामी विधानसभा निवडणूकीत मुंबईचा गड सर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिशन २५ हाती घेतल्याचे वृत्त आहे.

मुंबईतील ३६ पैकी २५ विधानसभेच्या जागांवर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने चाचपणी सुरु केली आहे. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने १४ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी ८ आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर ६ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत मुंबईतील चारपैकी फक्त एका जागेवर एकनाथ शिंदे यांना निसटता विजय मिळविता आला होता. लोकसभेच्या तीन जागा जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असून महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १४ जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे, तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचं नियोजन करत असल्याची माहिती मिळत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला. तर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत  अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल, असं दिसतंय.

 ठाकरेंची मिशन २५ मधिल विधानसभेच्या जागांमध्ये पुढील जागांचा समावेश आहे : शिवडी, भायखळा, वरळी,माहीम,चेंबूर

भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, वांद्रे पूर्व

विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, बोरिवली,मलबार हील , अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर

मुंबईत शिवसर्वेक्षण

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. याविधानसभा क्षेत्रातत शिव सर्वेक्षण अभियान राबवलं जाणार आहे.  मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर केले जाणार आहेत. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखली जाणार आहे.

मुंबईतील शिव सर्वेक्षण अभियानासाठी प्रमुख नेत्यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे

  • विनायक राऊत यांच्याकडे वरळी, दादर- माहीम
  • अनिल देसाईंकडे जोगेश्वरी आणि अंधेरी
  • अनिल परबांकडे मागाठाणे, दहिसर
  • राजन विचारे यांच्याकडे विलेपार्ले, कालिना
  • मिलिंद नार्वेकरांकडे दिंडोशी, गोरेगाव
  • सुनील प्रभू – मुलुंड, भांडुप
  • अजय चौधरींकडे चेंबूर, अणुशक्तीनगर
  • सचिन अहिर यांच्याकडे कुलाबा, मुंबा देवी
  • विलास पोतनीसांकडे शिवडी आणि मलबार हिल
  • वरून सरदेसाईंकडे सायन कोळीवाडा, धारावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *