ठाणे : भावा-बहिणीचे पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मनोरुग्णांच्या हातावर बांधल्या. या वेळी मनोरुग्ण भावांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
ठाण्यातील जागृती पालक ही विशेष मुलांची संस्था प्रत्येक सण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करते. गेल्या अनेक वर्षांपासून रक्षाबंधन सण संस्थेच्या वतीने उत्साहात साजरा केला जातो. याआधी अग्निशमन दल, टीडीआरएफच्या जवानांना, सफाई कर्मचारी आणि वाहतूक पोलिस, ज्येष्ठ नागरिकांना राख्या बांधून या विशेष मुलींनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला होता. यंदा जागृती पालक संस्थेच्या शेजारी असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांना विशेष मुलींनी राख्या बांधल्या. या कार्यक्रमात संस्थेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व मनोरुग्णालयातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
उपचारासाठी वर्षानुवर्षे कुटुंब, घरापासून दूर असलेल्या या मनोरुग्णांना भेटण्यासाठीही अनेकदा नातेवाईक येत नाहीत; मात्र या रक्षाबंधन सोहळ्याच्या निमित्ताने जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींचा आनंद द्विगुणित झाल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष संजीवन जाधव यांनी सांगितले. मनोरुग्णालयाचे अधीक्षक नेताजी मुळीक यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही जाधव यांनी नमूद केले. याप्रसंगी उपअधीक्षक प्राची चिवटे, समाजसेवा अधीक्षक श्रीषा कुलकर्णी, सतीश वाघ, डॉ. विजया खांडेपारकर, संस्थेचे उपाध्यक्ष संजीवन जाधव, प्रल्हाद चौधरी उपस्थित होते.
