आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचा उपक्रम
ठाणे : गेली अनेक वर्षे आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजनचे स्वयंसेवक आणि विठाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे केले जाते. यंदाही हा सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनी केले तेव्हा त्यांनी नमूद केले की, गेली २० वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या हर्षला लिखिते यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन दशेपासून त्या मनोरुग्णालयात येऊन रक्षाबंधन साजरे करतात याविषयी सांगितले व संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे देखील हा उपक्रम चालूच आहे याविषयी त्यांनी माहिती दिली. आपण समाजाचे देणे लागतो त्यामुळे आपण अशा विविध उपक्रमांना गेले पाहिजे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे याविषयी भाष्य केले आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमा – रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना ही परंपरा चालू ठेवा असेही संबोधले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मुळीक सर, ममता मॅडम, जाधव मॅडम व इतर सहकारी स्त्री व पुरुष रुग्ण, शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विश्वस्त व आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, कार्यक्रम अधिकारी प्रा. संजना भाबल, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अजय ब्राम्हणे, रजिस्ट्रार आकाश ढवळ, विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण, तुषार सावंत व इतर सदस्य मंडळी उपस्थित होते.
