विजेते सातारा सिंघमला २५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
अनिल ठाणेकर
ठाणे : प्रो गोविंदा सीझन २ च्या चषकावर सातारा सिंघमने (जय जवान गोविंदा पथकाने) आपल्या विजयाची मोहोर उमटवली. विजेत्या संघाला २५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा सातारा सिंघमने (जय जवान गोविंदा पथक) प्रो गोविंदा सीझन २ च्या चषकावर आपले नाव कोरले आहे. प्रो गोविंदा सीझन २ च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक कोल्हापूर कींग्ज (बालवीर गोविंदा पथक), तृतीय पारितोषिक लातूर लेजंट्स (यश गोविंदा पथक), चौथे पारितोषिक अलिबाग नाईट्स (श्री आग्रेश्वर गोविंदा पथक) संघाला घोषित करण्यात आले. यांना अनुक्रमे १५ लाख रुपये, १० लाख रुपये, ५ लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उर्वरित संघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रो गोविंदा सीझन २ मध्ये सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे मनापासून अभिनंदन करतो. मराठी मातीतला खेळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचतोय याचा मला अभिमान आहे. यामागे माझे सहकारी आमदार प्रताप सरनाईक व प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचे फार मोठे श्रेय आहे. हे दोघेही प्रो गोविंदाचे पाईक आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दहीहंडी खेळाला व्यापक स्वरुप दिले. त्यांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. सातारा सिंघम जेव्हा थरावर चढत होते तेव्हा तानाजी मालुसरे चढत आहेत की काय असं वाटतं होते, अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या. स्टार स्पोर्टस् वाहिनीने प्रो गोविंदा सीझन २ चे प्रक्षेपण दाखवल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार मानले. प्रो गोविंदा खेळाची व्यापकता वाढवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ७५ हजार गोविंदांचे विमा काढण्यात आले आहे. गोविंदा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करा, मात्र हा गोविंदा अपघात मुक्त करा असे आवाहन मुख्यमंत्री महोदयांनी केले. तसेच स्पेनलाही आपले गोविंदा पथक सलामी देण्यासाठी जाणार आहे यासाठी दहीहंडी समन्वय समिती खूप मेहनत घेत आहे असे ते म्हणाले.
प्रो गोविंदा सीझन २ च्या अंतिम सामान्यात सोळा संघ सहभागी झाले होते. प्रत्येक गोविंदा पथकांनी उत्कृष्टपणे आपले कौशल्य दाखवत उपस्थितांची मनं जिंकली. ३३.६९ मिनिटात थर रचत सातारा सिंघमने बाजी मारली. आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मी पाहिलेले स्वप्न पुर्वेश सरनाईक व त्यांच्या टीमने सत्यात उतरवले. गोविंदा हा खेळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जायचा आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील गोविंदांना प्रो गोविंदाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळाले. मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी या खेळास गती देण्याचे काम केले. राज्य शासनाने गोविंदा या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश केला. राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे आज हा खेळ एवढ्या मोठ्या व्यासपीठावर होतोय याचा आनंद आहे. भविष्यात गोविंदा या खेळाला नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत आम्ही पोहोचवला आहे. मैदानात खेळला जाणारा खेळ आज इनडोअर स्टेडिअममध्ये खेळला जात आहे. मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब पुढाकाराने व राज्य शासनाच्या पाठिंब्याने प्रो गोविंदा हे व्यासपीठ तयार करण्यात आले. या व्यासपीठाच्या माध्यमातून गोविंदा खेळ देशभरात पोहचला आहे. भविष्यात हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास आम्हाला नक्की यश मिळेल, असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केला.प्रो गोविंदा सीझन २ अंतिम सामान्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, सिद्धेश कदम, मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एन्टरटेन्मेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
