भाजपा, विश्वास सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे : भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरुणींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी देहभान विसरून पारंपरिक पद्धतीबरोबरच अभिनव कल्पना राबवून खेळ सादर करीत वयोवृद्धांची मने जिंकली. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रसार करीत काही गटांनी महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगरसेविका प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, दीपा गावंड, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, उपाध्यक्ष अनुराधा रोडे, सचिव माधुरी मेटांगे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सुनिता संजय वाघुले, सरचिटणीस रितू सिकॉन, शीतल कारंडे, प्रीती मणियार, नीता पाटील, वर्षा पाटील, तृप्ती जोशी, श्रुतिका मोरेकर, सुषमा ठाकुर, विद्या शिंदे, अर्चना पाटील, कांचन पाटील यांच्यासह यांच्यासह भाजपाच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत कांदिवली येथील कलादर्पण संस्थेने ५१ हजारांचे प्रथम बक्षीस व स्मृतीचिन्ह, पनवेल येथील सखी ग्रूपने द्वितीय क्रमांकासह २५ हजार व स्मृतिचिन्ह, अलिबाग येथील मनस्विनी मंगळागौर ग्रूपने दहा हजारांचे तृतीय आणि अंबरनाथ येथील जागर मंचने चौथ्या क्रमांकासह पाच हजारांचे बक्षीस व स्मृतीचिन्ह पटकावले. या स्पर्धेत माजिवडा येथील सृजन सख्या, सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील सखी मंगळागौर ग्रूप, पनवेल येथील नाच ग घुमा, राबोडी येथील जय महालक्ष्मी, ऐरोली येथील रुचिरा ग्रूपमधील महिला गटांना उत्तेजनार्थ बक्षीसाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत नऊ बक्षिसे देण्यात आली.
गडकरी रंगायतनमध्ये सकाळी सुरू झालेल्या या स्पर्धेला शेकडो महिलांनी गर्दी केली होती. त्यामुळे रंगायतनचा परिसर महिलांनी फुलून गेला होता. महिलांच्या एकेक गटाने आपले खेळ नाविन्यपूर्ण पद्धत व प्रचंड ऊर्जेचे प्रदर्शन घेऊन सादर केले. पारंपरिक वेश परिधान करीत महिलांनी देहभान विसरून मंगळागौरीच्या खेळाचा आनंद लुटला. पिंगा, लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठुंड केलं आदी पारपंरिक गीते महिलांनी सादर केली. काही महिला गटातील महिलांनी स्वत: पारंपरिक गीते गात सादरीकरण केले. त्याला महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात पसंती दिली.
ओवी पाटीलचे नृत्य ठरले लक्षवेधी!
`दाताच दातवन घ्या ग कुणी… कुंकू घ्या कुणी काळे मणी’ सारख्या लोकगीतावर नृत्याने सोशल मिडियावर प्रसिद्ध झालेली बालकलाकार ओवी पाटील हिची उपस्थिती लक्षवेधी ठरली. राज्यस्तरीय मंगळागौर कार्यक्रमातून ओवी पाटील हिच्या नृत्याला वन्स मोअर… मिळाला.
