मेधा पाटकर यांचा आंदोलनाचा इशारा
ठाणे :सफाई कामगार हे शहराची साफसफाई करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात; मनोरुग्णालयातील सफाई कामगार तर रुग्णालयाच्या साफसफाई बरोबर मनोरूग्णांच्या सफाईचीही जबाबदारी उचलतात. त्यांच्या कामाचं महत्व जाणून त्यांना खरं तर कंत्राटी पद्धतीने कामावर न ठेवता कायम स्वरूपी नोकरीत सामावून घ्यायला हवं पण या कामगारांना न्यायालयाने आदेश देऊनही किमान वेतन दिले जात नाही की मागील वेतनाची थकबाकी अजून दिली जात नाही, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर म्हणाल्या. ठाण्यातील शासकीय मनोरुग्णालयातील सफाई कामगार किमान वेतन मिळावं आणि वेतन थकबाकी मिळावी म्हणून १३ ऑगस्टपासून साखळी उपोषण करत आहेत. त्यांचे मनोबल वाढवून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मेधाताईंनी आंदोलन स्थळी भेट दिले. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, कंत्राटदाराने कामगारांना वेळाच्या वेळी वेतन, भत्ते दिले नाहीत तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ते कामगारांना देऊन कंत्राटदारांकडून वसूल केले पाहिजेत असा कायदा असताना इथे अधिकारी ते न करता कंत्राटदारावर सर्व सोपवतात. या कामगारांना अजून जुलै महिन्याचे वेतन दिलेले नाही. लवकरच कामगारांना न्याय नाही मिळाला तर साखळी उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात होईल, असा इशाराही त्यांनी मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला या वेळी दिला. यावेळी मेधाताईंनी महिलांना राखी बांधून या बंधनात आपण एकत्रितपणे राहून आपल्या हक्कांसाठी लढले पाहिजे असे सांगून त्यांना धीर दिला.
सफाई कामगारांना जुलै महिन्याचे वेतन रूग्णालय प्रशासन अदा करेल, आजच्या आज वेतन साठी प्रस्ताव अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांना पाठवण्याचे आदेश उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांनी डॉ नेताजी मुळीक आणि सीएओ श्री लांजेवार व प्रशासकीय अधिकारी डॉ रानडे यांना दिले. प्रादेशिक मनोरुग्गणालयातर्फे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ अशोक नंदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक, CAO गजानन लांजेवार AO. डॉ. रानडे यांच्या आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या वतीने श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर, उपाध्यक्ष डॉ संजय मंगला गोपाळ, महासचिव जगदीश खैरालिया, कार्यकारी सचिव अजय भोसले, कामगार प्रतिनिधी संघटक दिनानाथ देसले, अनिता कुमावत, सोनी चौहान, संजय सैदाणे , महेश निचिते आदी उपस्थित होते. यावेळी वागळे इस्टेट पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री जगताप उपस्थित होते. यावेळी सहा.संचालक डॉ चाकूरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री पाटणकर ही उपस्थित होते.
सदरच्या प्रस्तावावर मा. आरोग्य आयुक्त यांची मंजूरी घेऊन सोमवार पर्यंत वेतन अदा करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अतिरिक्त संचालक डॉ स्वप्निल लाळे यांनी युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांना मोबाईल वर चर्चा करताना आश्वासन दिले आहे. मागील पाच वर्षाच्या थकीत किमान वेतनाच्या फरकाची रक्कम ९५ लाख सात हजार चारशे छत्तीस रूपये, बोनस पोटी थकीत रक्कम एकवीस लाख पन्नास हजार एकशे शहाण्णव रूपये आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम बारा लाख एकशे चौसष्ठ रूपये अशी एकूण एक कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार सातशे शहाण्णव रूपये इतकी रक्कम सफाई कामगारांना देय असलेल्या रकमेचे मागणी पत्र यावेळी युनियन तर्फे उपसंचालक डॉ नंदापुरकर यांना सादर करण्यात आले. या बरोबरच इएसआयसी आणि अन्य सोयी सुविधा आदी इतर प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
सफाई कामगारांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य अजित डफले, स्वराज अभियानचे सदस्य सुब्रोतो भट्टाचार्य, समता विचार प्रसारक संस्था मीनल उत्तूरकर, सुनिल दिवेकर, किसन सिंग बेदी, अनमोल साळवी, मोनाली सरोदे.श्रमिक जनता संघाचे कार्यकर्ते किसन गडगिळे आणि सामाजिक कार्यकर्ते शरद जोशी हे उपस्थित होते.
