ठाणे : मो. ह. विद्यालयाची जवळपास तीन ते चार दशके निरलसपणे सेवा केलेल्या सेवाव्रती उषा मुकुंद केळकर आणि गणेश हरी उपाख्य बलुकाका पेंडसे या दोघांचा अभिष्टचिंतन सोहळा मो. ह. विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व शाळेचे माजी विद्यार्थी अभय ओक यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे मो. ह. विद्यालय, रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील माजी शिक्षिका श्रीमती उषा मुकुंद केळकर व माजी शिक्षक गणेश हरी पेंडसे (बलूकाका) या दोघांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी न्यायमूर्ती अभय ओक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी यायचं ठरलं तेव्हा दोन विद्यार्थ्यांनी विचारलं की, या रविवारी कोणता कार्यक्रम आहे. शाळा सोडून पन्नास वर्षे झाली पण 40-45 वर्षे ज्या शिक्षकांनी दिली त्यांचा सत्कार आहे आणि मी माझ्या शाळेतील शिक्षकांना अजूनही घाबरतो. महाविद्यालयात घराणेशाही नाही की वृक्षाला हात लावायचा नाही हे घटनेत लिहिले आहे हे मी माझ्या शाळेत शिकलो आहे. एस. व्ही. कुलकर्णी सर म्हणाले होते, शाळेच्या प्रांगणातील झाड मी पाडू देणार नाही अशा स्मृतींना अभय ओक यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा कुलकर्णी यांनी केले. हे वर्ष आजी-माजी शिक्षकांनी शाळेत सुरू केलेल्या अभिरूची मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त शाळेत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. शेडगे यांनी केले व आभार पर्यवेक्षक श्री. आडारकर सरांनी मानले.
सदर कार्यक्रमास शाळेचे अनेक प्रतिथयश माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, केळकर व पेंडसे कुटुंबीय तसेच ठाणे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
