मुंबई : दक्षिण मुंबईतील जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानेही संलग्नता जाहीर केली आहे. विद्यापीठाने त्यासंदर्भातील पत्रक १९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला पाठवले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपासून शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ४ जुलै रोजी जी.टी. रुग्णालयाच्या आवारात ५० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर या महाविद्यालयाला महराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता मिळणे आवश्यक होते. महाविद्यालय प्रशासनाने त्यासाठी अर्ज केल्यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने भेट देऊन सादर केलेला अहवाल आणि शैक्षणिक परिषदेच्या परवानगीनंतर महाविद्यालयाला २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी संलग्नता देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केले. विद्यापीठाने १९ ऑगस्ट रोजी त्यासंदर्भातील पत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवले आहे. विद्यापीठाकडून संलग्नता मिळाल्याने जी.टी. रुग्णालयाच्या आवारातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जी.टी. रुग्णलयाच्या आवारातील नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्नता देताना नियम व अटी घातल्या आहेत. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या नियम व अटींची पूर्तता करणे, शासनाचे नियम व विद्यापीठाने केलेल्या सुधारणांची अमलबजावणी करणे महाविद्यालयाला बंधनकारक आहे. शिक्षक भरतीसाठी विद्यापीठांची मान्यता घेणे, शुल्क नियामक प्राधिकरणाकडून प्रवेश शुल्कासाठी, तर प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून विद्यार्थी प्रवेशाबाबत मान्यता घेणे आवश्यक आहे. एआयएसएचई पोर्टलवर नोंदणी करणे व वेळोवेळी आवश्यक माहिती सादर करणे बंधनकारक असल्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय पातळीवर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या संकेतस्थळावर या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५० जागा प्रवेशासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू असलेल्या प्रवेशाच्या पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टपासून शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित करता येणार आहेत. तर २०२४-२५ चे शैक्षणिक वर्षाला पुढील एक ते दीड महिन्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *