ठाणे : अक्कलकोट निवासी स्वामी समर्थानी अनुग्रह दिलेले ठाण्यातील गुलाम पांडू नाखवा तथा श्री आनंद भारती महाराज यांचे निवासस्थान सुमार दोन शतकांनंतर आता लखू निवासाऐवजी आनंद मठ या नावाने ओळखले जाणार असल्याचे भावनिक मनोगत आनंद भारती महाराजांचे वंशज भगवान माणिक कोळी यांनी व्यक्त केले. निमित्त होते चेंबूरच्या श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याचे.
श्री स्वामी समर्थ आत्मलिंग मठाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या सांगता सोहळ्याचे औचित्य साधून स्वामी समर्थांचे अधिष्ठान असलेल्या महाराष्ट्रातील अक्कलकोट, परभणी, अहमदनगर, चिपळूण, कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, मुंबईसह ठाणे येथील मठाच्या संचालकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भालचंद्र आणि नृण्मयी या दांपत्याने भगवान कोळी यांची विधिवत पाद्यपूजा केली. यावेळी श्री आनंद भारती समाज आणि श्री आनंद भारती मठ यांच्यातर्फे ठाणे गौरव पुरस्कार विजेते सजावटकार प्रफुल्ल कोळी यांच्या संकल्पनेतून साकारलेले सन्मानचिन्ह देऊन श्री स्वामी समर्थ आत्मलिंग मठाचे मठाधिपती विजय आणि प्रकाश नलावडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कवडस, नागपूर येथील मौनीबाबांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या तैलचित्राचे मठात अनावरण करण्यात आले. प्रकाश नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर विवेक वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी ठाण्यातील आनंद मठाचे प्रतिनिधी म्हणून भगवान कोळी यांच्यासह अशोक नाखवा, प्रल्हाद नाखवा उपस्थित होते.
00000
