अशोक गायकवाड*

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गणेश भक्तांनी गणेशोस्तव साजरा करताना केंद्रीय प्रदूषण मंडळाने यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करून, उत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.
याबाबत ग्रामपंचायत स्तरावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती तालुकास्तरावर पंचायत समिती गट विकास अधिकारी, तसेच गावस्तरावर ग्रामसेवक, सरपंच यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घराघरात साजरा करण्यात येतो. देशात पर्यावरणपूरक सन साजरे करण्याच्या दृष्टीने केंद्रीय प्रदूषण मंडळाने १२ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उपाययोजना : शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी. सजावट करताना प्लास्टिक, थर्माकोलचा वापर न करता पाने, फुले व इतर नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा. उत्सवात लाऊडस्पिकरचा आवाज मर्यादित ठेवावा. निर्माल्य मंगल कळशात टाकून, त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी. गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण विषयक जनजागृती करावी. गणपती मूर्तींचे विसर्जन कुत्रिम तलावात करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *