ठाणे : राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून ठाणे शहरामधील हजारो महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचे फॉर्म भरले जात असून ज्यांनी फॉर्म अद्यापि भरले नाहीत त्यांनी ते भरावे. ज्यांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा झाले आहेत अशा लाभार्थी महिलांनी काल रक्षाबंधनाचे निमित्त साधून आमदार प्रताप सरनाईक व राज्य सरकार प्रती कृतज्ञता व्यक्त केली. आमदार सरनाईक यांना राख्या बांधण्यासाठी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांची गर्दी झाली होती. त्यातील शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार सरनाईक यांना रक्षाबंधन करून लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला. हा रक्षाबंधन सोहळा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी लाडक्या बहिणींशी बोलताना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.
‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे आमचे सरकार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने आणली. त्याचा मनापासून आनंद आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ म्हणजे माता-भगिनींप्रती कृतज्ञता आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १ कोटी ३ लाख लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामधील ५० हजाराहून अधिक महिलांनी या योजनेत अर्ज केले असून यातील हजारो महिलांच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार जमा झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे १७ ऑगस्ट, २०२४ ला पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तत्पूर्वी १५ ऑगस्टचे निमित्त साधत १४ ऑगस्ट पासून राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामधील हजारो भगिनींच्या देखील खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून त्याच्याकडून राज्य सरकारला धन्यवाद दिले जात आहेत. सोमवारी ठाण्यातील वर्तकनगर मधील आमदार प्रताप सरनाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनाच्या दिवशी शेकडो लाडक्या बहिणी स्वतः राख्या घेऊन आल्या होत्या. यावेळी आमदार सरनाईक यांना राख्या बांधण्यासाठी व त्यांचे औक्षण करण्यासाठी लाडक्या बहिणींची अक्षरश गर्दी व मोठी रांग लागली होती. २ तास हा सोहळा चालला. लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार साहेब धन्यवाद , आमदार प्रताप सरनाईक साहेब धन्यवाद , महायुती सरकार धन्यवाद असे विविध फलक हातात घेतले होते. रक्षाबंधन झाल्यानंतर सर्व महिलांना लाडू वाटप करण्यात आले. हजारो महिलांनी आमदार प्रताप सरनाईक व महायुती सरकारचा जयजयकार करीत ही योजना यशस्वीपणे आणल्याबद्दल आभार व्यक्त केले. रक्षाबंधनाच्या आधीच महाराष्ट्रातील १ कोटी ३ लाख लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून खात्यात ३००० जमा झाले आहेत. त्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांना पैसे खात्यावर आले आहेत. ३१ जुलैपर्यंत आलेल्या फॉर्म्सचेच हे पैसे असून ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या बहिणींच्या खात्यातही तब्बल ३ महिन्यांची रक्कम जमा होणार आहे. आमच्या बहिणींना पैसे देण्याचा निर्धार आम्ही पूर्ण केला. आमच्या माता-भगिनींप्रती आमची ही कृतज्ञता आहे, असे आमदार म्हणाले. ही योजना सुरूच राहणार आहे. ज्या महिलांचे फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रे नाहीत किंवा त्यांना अडचणी येत आहेत त्यांना शिवसेना शाखा व आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयातून सहकार्य केले जाईल. असेही आमदार सरनाईक यांनी सांगितले. यावेळी ओवळा-माजिवडा मतदारसंघाच्या महिला आघाडी प्रमुख सौ. परिषा सरनाईक, माजी नागसेविका सौ. विमल भोईर, सौ. आशा डोंगरे, विधानसभा सचिव श्री. संदीप डोंगरे, विभागप्रमुख श्री. रामचंद्र गुरव, श्री. भगवान देवकते, श्री. संतोष ढमाले, त्याचप्रमाणे महिला आघाडी, युवासेना तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
०००००
