तंबाखूमुक्त युवा मोहिमेंतर्गत राबवणार उपक्रम

 

मुंबई : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जागतिक तंबाखू दिनानिमित्त जाहीर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रातर्फे नागरिकांना तंबाखू सेवनाची सवय सोडण्यासाठी मदत करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तंबाखूजन्य आजार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी लाखो नागरिकांना कर्करोग, फुफ्फुसाचे आजार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात. जगामध्‍ये दरवर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्‍यू तंबाखू सेवनामुळे होतो. भारतामध्ये दरवर्षी सुमारे १० लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो. भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या आजारांचे आणि मृत्यूचे कारण तंबाखू आहे. त्यामुळे नागरिकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे जडलेले व्यसन सोडवण्यासाठी मदत करणे आणि तंबाखूजन्य आजार कमी करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘तंबाखूमुक्त युवा मोहीम २.०’ अंतर्गत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्ती केंद्र सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. ही केद्रे तातडीने सुरू करण्यासाठी महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तंबाखू मुक्ती केंद्रामध्ये रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशक, मानोपचार तज्ज्ञांची नेमणूक करणे, केंद्र कसे असावे, त्यात कोणत्या सोयी-सुविधा असाव्यात, त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमणे यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयांना आयोगाकडून ऑनलाईन मार्गदर्शनही करण्यात आले आहे. ‘तंबाखूमुक्त युवा अभियान २.०’अंतर्गत ही तंबाखूमुक्त केंद्रे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *