भारतातील खासगी क्षेत्रात नोकरी करणे कठीण झाले आहे. खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या बहुतेक लोकांची स्थिती दयनीय आहे. मिळालेल्या पगारातून बरेचजण खाण्यापिण्याचा खर्च कसा तरी भागवू शकत आहेत. घर, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे. यातील बहुतांश लोक बचतीचा विचारही करू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ‌‘वर्क इंडिया‌’च्या अहवालात याबबात माहिती देण्यात आली आहे.
खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना अनेक ठिकाणी दरमहा वीस हजार रुपयांपेक्षाही कमी पगार मिळत आहे. त्यामुळे समाजातील मोठ्या वर्गाला आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. ‌‘वर्क इंडिया‌’च्या अहवालानुसार, 57.63 टक्के खासगी नोकरांना वीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना किमान वेतनही दिले जात नाही. सुमारे 29.34 टक्के खासगी नोकऱ्या या मध्यम उत्पन्न गटातील आहेत. यातील वेतन वीस ते चाळीस हजार रुपये प्रति महिना आहे. या वर्गात मोडणाऱ्यांच्या जीवनात थोडीफार सुधारणा होते; पण त्यांना आरामदायी राहणीमान गाठता येत नाही. या श्रेणीत येणारे बहुतेक लोक जेमतेम दैनंदिन खर्च भागवत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
‌‘वर्क इंडिया‌’चे सीईओ नीलेश डुंगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी वेतनाच्या नोकऱ्यांमुळे असमानता निर्माण होत आहे. यामुळे केवळ आर्थिक आव्हानेच उभी रहात नसून सामाजिक स्थैर्यावरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यासाठी कौशल्य विकास, वेतन सुधारणा आणि उच्च वेतनाच्या संधी निर्माण कराव्या लागतील. केवळ 10.71 टक्के लोक दरमहा चाळीस ते साठ हजार रुपये पगार मिळवू शकतात, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये अशा पदांची संख्या खूपच कमी आहे. केवळ 2.31 टक्के खासगी नोकऱ्या लोकांना दरमहा साठ हजार रुपयांपेक्षा जास्त कमावण्याची संधी देऊ शकतात, असे चित्र आहे.
‌‘वर्क इंडिया प्लॅटफॉर्म‌’वरील दोन वर्षांच्या जॉब डेटाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये विविध क्षेत्रांमधील 24 लाखांहून अधिक नोकऱ्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये फील्ड सेल्स पोझिशन्स या सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या आहेत. यानंतर बॅक ऑफिस जॉब आणि टेली कॉलिंग प्रकार मोडतात. यामध्ये 40 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जात आहे. अकाउंटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट क्षेत्रातील नोकऱ्यादेखील चांगला पगार देतात. याशिवाय शेफ आणि रिसेप्शनिस्टही चांगली कमाई करत आहेत; पण डिलिव्हरीमधील नोकऱ्यांना सर्वात वाईट पगार मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *