ठाणे : प्रत्येक दिवस आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात गुंतलेल्या आमच्या माता भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा म्हणुन मंगळागौर सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते . आज त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहुन फार आनंद वाटला. मात्र हाच आनंद कोलकत्ता आणि बदलापुर सारख्या घडणा-या घटना या हिरावुन घेत असतात . अश्या समाजविघातक वृतींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पाउले उचलावीत” असेमत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी व्यक्त केले. जिजाऊ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्यने महिलांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना निलेश सांबरे बोलत होते.
जिजाऊ संस्थेच्यावतीने आयोजित सर्व वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत या कार्यक्रमात रंगत आणली होती. विविध ठिकाणाहून आलेल्या अनेक महिला मंडळांनी आपल्या उत्स्फूर्त अश्या सादरिकरणाने जिजाऊ संस्थेची मंगळागौर स्पर्धा ही विशेष लक्षवेधी ठरली. पारंपरिक आणि आधुनिक मंगळागौर यांची सांगड घालत सामाजिक संदेशही या माध्यमातून त्यांनी दिला. यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगणा नमिता पाटील यांनी एक सुंदर असे नृत्य सादर करत उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केला.तर बिगबॉस फेम रुचिता जाधव हिने देखील सहभागी झालेल्या महिलामंडळासोबत सहभाग घेत आनंद लुटला. या स्पर्धेत प्रथम आलेल्या मंडळाला प्रथम पारितोषिक – रु. ५१,०००, द्वितीय पारितोषिक रु. २५,०००, तृतीय पारितोषिक रु. १०,०००, आणि उतेजनार्थ पारितोषिक रु. ५,००० तसेच उतेजनार्थ पारितोषिक रु. २,००० चे एकूण ५ बक्षिसे असे वितरण करण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेली १५ वर्ष कोकणातील पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात आरोग्य , शिक्षण , रोजगार , शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्यांवर काम करत आहे . संस्थेमार्फत चालू असलेल्या विविध मोफत उपक्रमांचा लाभ समाजातील गोर गरीब लोकांना होत आहे. आजपर्यंत लाखोंच्या संख्येने या उपक्रमांचा लाभ अनेक गरजूंनी घेतला आहे. याच अनुषंगाने संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभागांतर्गत समाजातील विविध गरजू होतकरू आणि विविध कौशल्य असलेल्या महिलांनी एकत्रित यावे त्यांच्या विचारांची देवान – घेवाण व्हावी, त्यांच्यातील कलागुण वाढीस लागावे आणि त्याचा त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या लघु उद्योग , स्वयंरोजगार प्रशिक्षण अश्या विविध उपक्रमांची माहिती या महिलांना मिळावी आणि त्याचा त्यांना लाभ व्हावा या हेतूने संस्था मंगळागौर सारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहे. याहीवर्षी या परंपरेचा जागर करत मंगळागौर हा उत्सव आयोजित करण्यात आला होता.
0000
