अनिल ठाणेकर

 

ठाणे : पोलीस हे जनतेच्या संरक्षणासाठी की, गुंडपुंड राजकारण्यांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या इशाऱ्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी ? असा सवाल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी उपस्थित केला. बदलापूरमधील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील, वय वर्षे चार आणि वय वर्षे सहा या वयोगटाच्या दोन अल्पवयीन चिमुरड्या बालिकांवर, याच शाळेतील अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक व घृणास्पद घटना घडलेली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनाप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सहसचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे, ठाणे शहर अध्यक्ष जगन्नाथ सलगर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव समीर चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख संजय दळवी यांच्यासह, अविनाश सावंत, अमित लिबे, निलेश सावंत, संभाजी गिरी आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राजन राजे म्हणाले, “प्रश्न केवळ बलात्काराचा नसून, पोलिसांच्या व राजकारण्यांच्या बेकायदेशीर, बेईमान आणि नीतिशून्य व्यवहारातूनच बदलापूरकर जनतेच्या संतापाचा विस्फोट झालाय. पोलीस प्रशासन व राजकारणी यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाल्यामुळेच, बदलापूरचे आंदोलन हिंसक बनून, ते आवरणं कठीण झालं होतं. म्हणूनच, पोलीस आणि सत्ताधाऱ्यांनी, सर्वप्रथम आपलं वर्तन, कार्यपद्धती सुधारावी आणि मगच, आंदोलकांवर कारवाई करावी. बदलापूरचं आंदोलन हे, एकूण परिस्थिती पाहता, उत्स्फूर्त व अत्यंत स्वाभाविक होतं, त्यामुळेच आंदोलकांवरील कारवाई तत्काळ मागे घ्या; अन्यथा, राजीनामे देऊन तोंड काळे करा!” असा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, बालिकांवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर, शाळेतील समस्त पालकवर्ग आणि बदलापूरकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरुन तीव्र निषेध-आंदोलन करीत, तब्बल ११ तास लोकल ट्रेनची वाहतूक रोखून धरली होती. प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार, दोन्ही पिडीत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर, सुरुवातीला शाळा प्रशासन आणि बदलापूर पोलिसांनी, संगनमताने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच, पीडित बालिकांचे पालक, पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता, पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका शुभदा शितोळे या महिला अधिकारीकडून, त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या संतापजनक प्रकारानंतर जनप्रक्षोभ उसळल्यावर, पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात करुन, तपासकार्यात चालढकल केल्याच्या सबबीखाली शुभदा शितोळे यांची, ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केल्याचे निदर्शनास आलेले आहे. ही बाब अत्यंत निंदनीय असून, संबंधित महिला पोलीस अधिकारी यांची बदली करणे म्हणजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली नसून, ज्या शुभदा शितोळे यांनी, शाळा प्रशासन आणि नराधम आरोपी यांना, पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर कठोर-कायदेशीर कारवाई करणे हे क्रमप्राप्त ठरते. दुर्दैवाची बाब अशी की, एक महिला असूनही, अल्पवयीन चिमुरड्या बालिकांवर लैंगिक अत्याचार झालेला असतानादेखील, शुभदा शितोळे या महिला पोलीस अधिकारीने, पिडीत बालिकांच्या पालकांची तक्रार नोंदवून घेण्यास हलगर्जीपणा करीत, त्यांना तब्बल १२ तास ताटकळत ठेवले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे. याप्रकरणी नराधम आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा होईलच; परंतु, आपल्या कायदेशीर कर्तव्यात कसूर करणाऱ्या शुभदा शितोळे यांची, फक्त ठाणे नियंत्रण कक्षात बदली करणे म्हणजे, पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाच्या गृहविभागाकडून, संबंधित महिला पोलीस अधिकारीस पाठीशी घालण्यात येत असल्याचे, यानिमित्ताने स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. तरी, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करुन, शुभदा शितोळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा आणि नराधम आरोपीस पाठीशी घालण्यात आल्याच्या आरोपाखाली, त्यांना पोलीससेवेतून तत्काळ बडतर्फ करुन, त्यांना सहआरोपी म्हणून घोषित करण्यात यावे आणि सश्रम कारावासाची कठोर शिक्षा ठोठावण्याकामी योग्य त्या न्यायालयीन कार्यवाहीची पूर्तता करण्यात यावी. त्याचप्रमाणे ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेच्या प्रशासनाने, आपल्या शाळेतील चिमुरड्या बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण गांभीर्याने न घेता, बलात्कारी नराधमाला पाठीशी घालून आणि पोलीस प्रशासनाशी संगनमत साधत केलेल्या कृत्याबाबत, संबंधित शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने यावेळी करण्यात आली. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत निषेधार्ह आहे आणि म्हणूनच या घटनेचा निषेध करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार, दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर लोकशाही आणि सनदशीरमार्गाने निदर्शने करण्यात आली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाचे प्रमुख या नात्याने, आपण योग्य ती कार्यवाही करीत, सर्व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत, शासनदरबारी पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *