माथेरान : मध्य रेल्वेने माथेरान रेल्वे स्टेशन परिसरात जुन्या हेरिटेज वास्तूमध्ये अनधिकृतपणे तोडफोड करून अनधिकृतपणे पॉड हॉटेलचे बांधकाम सुरू केले आहे यासाठी हेरिटेज कमिटी व नगर परिषदेची परवानगी घेतलेली नाही हेरिटेज वास्तूमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून हा परिसर आणखी विद्रूप  बकाल करण्याचे काम रेल्वे प्रशासन करत आहे माथेरानच्या स्थानिकांकडून पर्यटकांसाठी सुरू असलेल्या पर्यटकांसाठी घरगुती निवासाच्या (होम स्टे) या व्यवसायावर या पॉड हॉटेलमुळे गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही शेकडो स्थानिकांवर हॉटेलमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळे स्थानिकांना गरिबीकडे नेणाऱ्या या हॉटेलचे नवीन बांधकाम त्वरित थांबवावे अन्यथा माथेरानकरांना तीव्र आंदोलन छेडावे लागेल आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल या आशयाचे निवेदन माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना दिले आहे.
राज्यातील एकूण सतरा पर्यटनस्थळांपैकी सर्वांचे आवडते प्रदूषण मुक्त ठिकाण म्हणून रायगड जिल्ह्यातील माथेरान कडे पर्यटकांचा अधिक कल असतो.परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित पणामुळे ह्या ठिकाणाला विकसनशील क्षेत्र होण्यास विलंब लागत आहे. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी, अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आजही संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.
वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाह कामी काही स्थानिकांनी पर्यटकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी घरगुती लॉज बांधलेले आहेत.त्यामुळेच सर्वसामान्य पर्यटकांना माफक दरात राहण्याची सोय उपलब्ध होत आहे.
त्यातच काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने स्टेशन भागात पर्यटकांसाठी पॉड हॉटेल उभारण्यासाठी काम सुरू केले आहे.याबाबत काही प्रसार माध्यमांनी ऑगस्टमध्ये पॉड हॉटेलचे काम पूर्ण होणार अशाप्रकारे वृत्त सुध्दा अत्यंत घाईगडबडीत प्रसिद्ध केले होते. या पॉड हॉटेलमध्ये शंभर खोल्या असणार आहेत. कदाचित खूपच अल्पदरात रेल्वे व्यवस्थापनाने पर्यटकांना खोल्या दिल्यास याचा विपरीत परिणाम स्थानिकांच्या लॉज वर होणार आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली असताना खासकरून मिनीट्रेन सफरीसाठी येणाऱ्या पर्यटकांना नेरळहुन माथेरानला येण्यास ट्रेन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास होत असतो. शटल सेवेतून भरीव उत्पन्न प्राप्त होत असताना देखील त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही. पर्यटकांना अभिप्रेत असणारी मिनीट्रेन सुविधा उपलब्ध करण्याऐवजी रेल्वे प्रशासन पॉड हॉटेल बांधण्याकडे अधिक कल देत आहे.आणि हे होत असलेले काम सुध्दा जुन्या स्ट्रक्चरलवर केले जात असून जुनेच पत्रे लावले जात आहेत. या करोडो रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कामाची परवानगी हेरिटेज कमिटी कडून घेतली नसल्याचे खात्रीलायक बोलले जात आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *