पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने झालेल्या कोंडीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला यश मिळालं असून आज झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला. परीक्षेची नवी तारखी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. या आंदोलनाची दखल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही घेण्यात आली होती. महाविकास आघाडीचे काही नेते या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आयोगाच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर आयोगाकडून आज गुरुवारी सकाळी १० वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
