राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील भांगवाडी चासोळे गावातील एका आदिवासी कुटुंबाच्या घरावर वीज पडल्याने एक ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य ३ महिला गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
मुरबाड तालुक्यातील टोकावडे या आदिवासी बहुल भागातील भांगवाडी चासोळे या गाव परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्या सह विजेच्या लखलखाट होऊन पावसाने हाहाकार माजवला होता. याच प्रसंगी भांगवाडी येथील गावा बाहेर असणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाच्या घरात ४ महिला व १ पुरुष घरात बसले असताना अचानक मोठ्या आवाजा सह त्या घरावर विज कोसळली त्यात ४० वर्षीय रुक्मिणी गोपाळ मेंगाळ यांच्या अंगावर विज पडल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या तर नंदा गुलाब मेंगाळ, हेमी अनंता लोभी, हौशा जैतू हिंदोळा ह्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रसंगी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पवार, मा. जि.प सदस्य संजय पवार, मा. पंचायत समिती सदस्य अनिल घरत आणि समाजसेवक बंडूशेठ पवार यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेऊन योग्य ती जखमींना मदत केली.
0000