केतन खेडेकर

 

मुंबई : गिरगावातील मुगभाट क्रॉस लेन इथल्या विठ्ठल मंदिरत दक्षिण मुंबई दैवज्ञ समाज महिला मंडळच्या वतीने सामूहिक मंगळागौरीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी सकाळी शुभमुहूर्तावर करण्यात आलेल्या मंगळागौरी पूजनाचा मान नुकत्याच लग्न बंधनात बांधल्या गेलेल्या नऊ वधूंना देण्यात आला होता. त्यामुळे नववधूंच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित व गगनात मावेनासा झाला होता.मंदिराचे सभागृह सकाळपासूनच महिलांनी खचाखच भरून गेले होते.ह्या वेळेस ५०० हून अधिक महिलांनी हजेरी लावत ह्या सामूहिक मंगळागौरी कार्यक्रमाचा भरघोस आनंद लुटला.
सकाळी मंगळागौरी पूजन आटपल्यानंतर दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यावर सर्व महिला भगिनींची पावले पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने वळू लागली होती आणि पहतपहता मंदिराचे संपूर्ण सभागृह महिलांनी पुन्हा गच भरून गेले होते. संध्याकाळी मंगळागौरीचे खेळ सरू होण्यापूर्वी महिलांच्या अंगात नवचैतन्य आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी आयोजकान तर्फे संध्याकाळच्या सुमारास थालीपीठ, बिरड आणि शिरा अशा प्रकारच्या पौष्टिक नाश्त्याची खास सोय करण्यात आली होती. भेदभाव न करता सर्व जाती-धर्मातील महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे अध्यक्ष कमलाक्षी उसपकर यांनी सांगितले.
मंगळागौरीला विविध खेळ खेळत  जागरण करण्याची अगदी पूर्वपार काळापासून परंपरा चालत आलेली आहे. यामध्ये मंगळागौरीची आरती केल्यानंतर रात्रीच्या वेळेस अनेक विधी आणि जुनी गाणी म्हणत लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, फू बाई फू, अठूडं केलं गठूडं केलं अशी पारंपरिक गाणी आणि खेळ खेळत अनुभवी महिलां सोबत नववधूंनी देखील या कार्यक्रमात सामील होऊन खूपच मज्जा लुटली . नऊवारी साडी, नाकात पारंपरिक नथ, दागिने असा पेहराव करत नववधू देखील हौशीने सहभागी झाल्या होत्या.
सामूहिक मंगळागौर कार्यक्रम सुरू करून आज ३२ वर्षे उलटली आहेत. मंगळागौरी पूजनाला सकाळी नववधुना पूजनाचा मान दिला जातो. मंगळागौरीचे २५ वे वर्ष मोठ्या थाटामाठात आणि धुमधडाक्यात साजरे करण्यात आले होते त्यावेळेस जवळ जवळ दोन हजारहून जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम एका मोठ्या सभागृहात पार पडला होता.
कल्याण, डोंबिवली, विरार, भांडुप,खार,सांताक्रुज, पनवेल येथून महिला मंडळी नववधूंना सोबत घेऊन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. अशा प्रकारचे सामूहिक मंगळागौर पूजन कुठेही होत नाही. आमच्या भगिनी स्टेशन करत असतात अशी माहिती दक्षिण मुंबई दैवज्ञ महिला समाजाचा उपाध्यक्ष कविता साने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *