जळगाव : जळगावच्या १४ भाविकांचा नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये ३१ जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्यात अडथळे आले.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल, या गावातले सर्व भाविक होते. घटनेची माहिती मिळताच  गावात अतिशय शोकाकूल वातावरण आहे. गावातील भाविक  हे १६ ऑगस्टपासून अयोध्या नेपाळ काठमांडू देवदर्शनासाठी गेले होते. १६ ते २८ ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होतो.एकूण दोन लक्झरी बस नेपाळला गेल्या होत्या. गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून   नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.

भुसावळमधील १०४ लोकांचा गट १० दिवसांच्या दौऱ्यासाठी दोन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून प्रवास करत होता आणि त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट दिली. शुक्रवारच्या दिवशी काठमांडूसाठी रवाना झालेल्या या तीन बसपैकी एक बस नदीत दुर्घटनाग्रस्त झाली. सशस्त्र पोलिस बल कुरिंतरचे प्रमुख माधव प्रसाद पौडेल यांनी सांगितले की, या तीनही बसमध्ये बहुसंख्य प्रवासी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.

मृतांचे पार्थिव लवकरच महाराष्ट्रात आणणार देवेंद्र फडणवीस

 राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  तसेच, महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, असेही फडणवीसांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *