मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या आपकडून महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तीन उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेत. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठवाड्यातील तीन जागा आम आदमी पार्टीने जाहीर केल्यात बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटकांकडून जाहीर करण्यात आलाय. परभणीत पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात जरी आम आदमी पार्टी इंडिया अलायन्स बरोबर असली तरी महाराष्ट्रात मात्र ते विधानसभेच्या २८८ जागा स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झालंय.
काही दिवसांपूर्वी आप नेत्या प्रीती शर्मा यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आम्ही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. प्रीती शर्मा म्हणाल्या होत्या की, आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत. मुंबईतील ३६ जागा लढण्याची तयारी आम्ही केली आहे. असेही त्या म्हणाल्या.