ठाणे : बाळकुम येथे नुकतेच इस्कॉन मंदिर उभारण्यात आले आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने या मंदिरात ५० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील बाळकुम, कापूरबावडी, कोलशेत, ढोकाळी भागात मोठ्या कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसांसाठी वाहतुक बदल लागू केले आहेत.

बाळकुम येथील पिरॅमल वैकुंठ परिसरात इस्कॉन मंदिर आहे. या मंदिरात दररोज नागरिक दर्शनासाठी जात असतात. सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यामुळे इस्कॉन मंदिरामध्ये जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यासह विविध भागातून रविवारी (आज) पासून सोमवारी भाविक या मंदिरारामध्ये दर्शनासाठी येण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. बाळकुम, कोलशेत, ढोकाळी भागात गेल्याकाही वर्षांमध्ये मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथे नागरी वस्ती देखील वाढली आहे.

तसेच याच भागात ठाणे महापालिकेचे सेंट्रल पार्क हे उद्यान आहे. या उद्यानात देखील नागरिक येत असतात. असे असले तरी येथील रस्ते अद्यापही अरुंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागतो. इस्कॉन मंदिरातील कार्यक्रमांमुळे भाविकांची वाहने आल्यास त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होऊन कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात वाहतुक बदल लागू केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *