ठाणे : ठाणे आणि बोरिवली मधील प्रवासाचे अंतर अवघ्या १२ मिनिटांवर आणण्याची क्षमता असलेल्या ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पातील ठाणे महापालिकेकडील विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच घेतला.
ठाणे – बोरिवली भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीए करीत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून याचा बहुतांश भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील भूसंपादन, अतिक्रमणे हटविणे, वृक्ष प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी आदी ठाणे महापालिकेशी निगडीत विषय एमएमआरडीए आणि बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्त सौरभ राव यांच्या समोर मांडले. या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहायक संचालक, नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त (उद्यान) मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले आदी उपस्थित होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देवून पाहणी केलेली आहे. त्यानुसार, परवानगीबद्दलचे विषय मार्गी लागतील. जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळा प्रवेश मार्ग आदी बाबींबाबत एकत्रित पाहणी करून लगेच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केले. भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली. त्यासंदर्भात, महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली.
