रमेश औताडे
मुंबई : दहीहंडी उत्सव एक इव्हेंट झाला आहे. लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र हे लाखो रुपये गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी आले तर ? हा विचार घेऊन दहीहंडी कार्यक्रमाचे अडीच लाख रुपये गोरगरीब रुग्णांच्या उपयोगी आणण्यात येणार आहेत.
समाजसेवक तसेच धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख यशवंत विचले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील दहीहंडीच्या पथकाची संख्या १०० वरून २५ करत शिल्लक ७५ पथकाची बक्षीस रक्कम गरीब रुग्णांना देण्यात येणार आहे.
अडीच लाख रुपये असणारी ही रक्कम थोडी वाटत असली तरी एक नवा पायंडा आम्ही पाडत आहोत असे सांगत धुळप म्हणाले, असे जर सर्वच दहीहंडी आयोजकांनी केले तर एक चांगले समाज उपयोगी कार्य होईल. २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील दादर मध्ये केशवराव दाते मैदान येथे दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.