अनिल ठाणेकर
ठाणे : पेसा कायद्यानुसार आदिवासी १७ संवर्गाच्या नोकरभरती झाल्या पाहिजेत म्हणून नाशिक येथे १ ऑगस्ट २०२४ रोजी पासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यास पाठिंबा म्हणून २३ ऑगस्ट २०२४ रोजी डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या ठिकाणी डीवायएफआय युवा संघटना तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, कष्टकरी संघटना, इतर आदिवासी संघटना, यांच्या वतीने हजारों लोकांचा रस्ता रोको करण्यात आला.
या वेळी डहाणू मतदारसंघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, विक्रमगड मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा, कष्टकरी संघटनेचे नेते ब्रायन लोबो, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव किरण गहला, डीवायएफआय चे राज्य अध्यक्ष नंदू हाडळ व जिल्हा सचिव राजेश दळवी, राज्य कमिटी सदस्य सुरेश भोये व दत्तू भोंडवा, किसान सभेचे नेते रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, रामू पागी, रामदास सुतार, सीटूचे नेते लक्ष्मण डोंबरे, तसेच माकप व इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या पेसा भरती आंदोलनाला पाठिंबा म्हणून २४ ऑगस्ट २०२४ रोजी शहीद राजगुरू यांच्या जयंतीदिनी तलासरी तालुक्यातील तलासरी व उधवा बाजारपेठ १००% बंद ठेवून व्यापारी वर्गानेही चांगला प्रतिसाद दिला.