रायगड : २५ फेब्रुवारीला जर्मनी देशातील बाडेन वुटेनवर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. ज्यामध्ये वाहनचालकांचा समावेश असून सदर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पानुसार प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरण्यासाठी QR Code जारी करण्यात आला असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण महेश देवकाते यांनी दिली आहे.
मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपध्दती निश्चित केल्यानुसार जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व तांत्रिक समित्या गठित करण्यात आल्या असून परिवहन आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली वाहनचालक (बस, रेल्वे, ट्रक, हलकी व जड वाहने) या ट्रेडकरिता परिवहन समिती स्थापन करण्यात आली असून शासकीय करारानुसार कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी जिल्हास्तरावर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच भरती प्रकिया संदर्भात आवश्यक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा.