पालिकेची स्वतःची मिनीबस सुरू होण्याच्या प्रतिक्षेत नागरिक !

माथेरान : माथेरान करांच्या कर्जत ते माथेरान दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेचा मुख्य कणा म्हणून मिनीबस सेवेला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते.या सेवेचा लाभ सर्वसामान्य लोकांना, व्यापारी त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टीने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर होत आहे. ११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच अनेक खडतर आव्हाने पेलून ही मिनीबस सेवा उपलब्ध झाली असून आजवरच्या काळात याच सेवेच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपले करियर करता आले आहे.सुरुवातीला ह्या बसने उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु काही वर्षांपासून ह्या बसने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच या मार्गावरील दोन बसेसची पुरती वाताहत झाली असल्याने घाटरस्त्यात कुठेही बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही बस व्यवस्थित प्रवास देईल याचीही शाश्वती राहिलेली नाही. पर्यटनस्थळ माथेरान मध्ये स्थानिकांना आजवर आपल्या मूलभूत अधिकार असो किंवा गावाची विकासात्मक कामे असोत नेहमीच इथल्या गलिच्छ राजकारणापायी संघर्ष करावा लागत आहे.राज्यातील विविध ठिकाणी सर्वत्रच शासनाच्या मिनीबसेस प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच या मार्गावर स्वतःच्या दोन बसेस उपलब्ध करून दिल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे नियमित प्रवास करणाऱ्या व्यापारी वर्गाला, नागरिकांना सोयीचे ठरू शकते असे स्थानिक बोलत आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणारी कर्जत माथेरान मिनीबसची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सुरुवातीच्या काळात माथेरानसाठी दोन मिनी बस दिल्या गेल्या होत्या नंतर त्यातील एक बस ही पनवेल येथे फिरविण्यात आली त्यामुळे येथील नागरिकांना एकाच बसवर अवलंबून राहून खडतर प्रवास करावा लागत आहे.फार जुनी बस असल्याने नेरळ माथेरान घाटात अचानक बंद पडल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन किमान दोन नवीन बस नागरिकांच्या सेवेत आणल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर होईल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला देखील याचा निश्चित फायदा होईल.

चंद्रकांत जाधव— अध्यक्ष क्षत्रिय मराठा समाज माथेरान

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *