मुंबई : मुंबईकरांसाठी खुषखबर आहे. यंदा मुंबईकरांना गणपती बाप्पाचे डे -नाईट दर्शन घेता येणार आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे दर्शन डे-नाईट गणेशभक्तांना घेता यावे, यासाठी ‘बेस्ट’ (BEST) उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ मार्गांवर २४ अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
या बस ७ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तर गेल्या वर्षीही बेस्ट उपक्रमाने शेवटच्या पाच दिवसांत रात्रभर बस सेवा दिली होती. दरम्यान, यंदाही राज्य सरकारच्या सूचनेनुसार दहा दिवस बस सेवा देण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील गणेशभक्तांना गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे रात्रभर दर्शन घेता येणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, लालबागच्या राजाच्या दर्शनाला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता. लालबाग उड्डाणपूलाखालील वाहतूक ही बंद केली जाते. यावेळी करीरोडचा नव्यानं झालेला उड्डाणपूल लक्षात घेता. दक्षिण मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरून येणारी वाहतूक ही लालबाग उड्डाण पुलाखालून भारतमाता सिग्नलहून करी रोडच्या दिशेनं वळवत पुढे ना. म. जोशी मार्गे दक्षिण मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. शक्यतो भाविकांनी लालबाग राजाच्या दर्शनाला येताना लोकलनं यावं, असं आवाहन पोलिसांनी केलं असून वाहनं घेऊन आल्यास ती वाहनं लोढा पे अॅड पार्क किंवा कल्पतरू पे अॅड पार्कचा वापर करावा. दर्शनासाठी आलेल्यांनी रस्त्यांवर वाहनं उभी करून जाऊ नये, अशा गाड्यांवर कारवाईसाठी मोठ्या संख्येनं टोविंगव्हॅन या परिसरात तैनात राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अशी असेल बस सेवा
४ लि. – डॉ. एम. इक्बाल चौक ते ओशिवरा आगार
८ लि. – जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर टर्मिनस
ए-२१ – डॉ. एस.पी.एम. चौक ते देवनार आगार
ए-२५ – बँकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन)
ए-४२ – पं. पळुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) ते सँन्डहर्स्ट रोड स्थानक
४४ – वरळी गाव ते एस. यशवंतराव चौक (काळाचौकी)
५१ – इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रुझ आगार
६९ – डॉ.एस.पी.एम चौक (म्युझियम) ते पी.टी. उद्यान, शिवडी
६६ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राणी लक्ष्मीबाई चौक (शिव)