मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि आमदार यांनी विजयाची हंडी फोडत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा एल्गार पुकारला. निमित्त होते राहुल नारायण कनल आणि जश वीरा यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर-मध्य मुंबई क्षेत्राचे युवासेना प्रमुख अक्षय विजय पनवेलकर आयोजित लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा सराव शिबिराचे.
सांताक्रूझ येथील धर्मवीर संभाजीराजे क्रीडांगणात मुंबापुरीतील १८६ गोविंदानी सहभागी होत मंगळवारी होणाऱ्या दहीहंडीसाठी आपली तयारी आजमावली. सुमारे दहा हजाराहून अधिक गोविंदाप्रेमी थर रचण्यासाठी चाललेला गोविंदाचा थरार अनुभवत असताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि ऍड आशिष शेलार यांनी विधानसभा निवडणूकीची हंडी फोडत असल्याचे सांगत आगामी निवडणुकीकरता महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.
यावेळी सात गोविंदा पथकांनी सात थर रचत प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. श्री साईनाथ गोविंदा पथकाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.याशिवाय सहा आणि पाच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांनाही रोख पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांनी डॉ श्रीकांत शिंदे आणि राहुल कनल यांचे रक्षाबंधन करत त्यांचे आभार मानले.