शेतकऱ्याने बिल्डरला मारहाण करून कार्यालयातील ६५ हजार रुपये केले लंपास
अखेर ४ दिवसांनी गुन्हा दाखल मात्र शेतकरी फरार पनवेल : तालुक्यातील उसर्ली खुर्द गावातील शेतकरी बळीराम भोईर यांच्या जागेवर इमारत विकसित करणारे बांधकाम व्यावसायिक अयाझ मर्चंट यांना शुक्रवारी जागा मालक बळीराम भोईर यांनी आपल्या अन्य ३ साथीदारांसह जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर अयाझ मर्चंट यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी त्यांना प्रथम उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. २ दिवस उपचार घेतल्यानंतर अयाझ मर्चंट हे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात फेऱ्या मारू लागले आणि अखेर ५ दिवसांनी आरोपी बळीराम भोईर यांच्यासह अन्य ३ साथीदारांवर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अयाझ मर्चंट यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांनी दिनांक १६ ऑगस्ट रोजी विकसित केलेल्या इमारतीमध्ये ग्राहकांना फ्लॅट दाखवून पुन्हा त्यांना बस स्थानकात सोडले. यानंतर याच इमारतीच्या त्यांच्या विकासक कार्यालयात ते गेले असता, जागा मालक बळीराम भोईर आणि अन्य ३ साथीदार यांनी त्याठिकाणी येवून अतिरिक्त पैशाचा लगादा लावला. यावर अतिरिक्त पैशाशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्यामुळे जगामालक आणि अन्य तिघांनी बांधकाम व्यावसायिक अयाझ मर्चंट यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अयाझ मर्चंट यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून त्यांच्या छातीला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर घटना घडताच अयाझ मर्चंट यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले. मात्र नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचार घेण्यासाठी पाठविले. शहरातील गांधी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अयाझ मर्चंट यांनी संबंधित जागा मालक शेतकरी बळीराम भोईर आणि अन्य ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अखेर ५ व्या दिवशी जागा मालक शेतकरी बळीराम भोईर यांच्यासह अन्य ३ जणांविरोधात भा. दं. वि. कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश शेलकर हे करीत आहेत. ००००
