अवघ्या ८ महिन्यात तीन लाख पर्यटकांनी दिली भेट…! पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना सलाम…! राजन आनंद चव्हाण सिंधुदुर्ग: ‘ होय ‘ ‘ जेव्हा लोक प्रवास करतात,तेव्हा त्यांचं आयुष्य बदलतं असं म्हणतात…! ‘ १,मे,११९७ रोजी जेव्हा सिंधुदुर्ग हा देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तेव्हा आम्हालाही असच वाटत होतं.देश – विदेशातले पर्यटक इथं येतील,इथले स्वच्छ – सुंदर समुद्र किनारे बघतील,निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद उपभोगतील,इथल्या ऐतिहासिक गड- किल्ल्यांचा,इथल्या संस्कृतीचा – कलेचा अभ्यास करतील,इथल्या कोकणी मेव्याचा,मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतील जेणेकरून आमचंही जीवनमान सुधारेल.मात्र गेल्या २७ वर्षात म्हणावा तसा बदल,म्हणावी तशी परिस्थिती बदललेली दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन(१, मे १९८१)जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हा या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न सुमारे २५ ते ३० हजाराच्या आसपास होतं. कोणत्याही भागाचा,प्रांताचा,देशाचा, विकास हा तिथल्या पायाभूत सुविधा,दळणवळणाची साधनं,उपलब्ध साधनं- संपत्ती, यावर खरं तर अवलंबून असतो.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष कै.जॉन केनेडी यांचं एक वाक्य नेहेमीच लक्षात ठेवायला हवं.’अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथले रस्ते चांगले आहेत असं नाही,तर अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचे सर्व श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री अ.र.अंतुले आणि त्यांचे खास विश्वासू सहकारी, तत्कालीन राज्यमंत्री एस.एन.देसाई यांनाच जातं. कुडाळ- वेंगुर्ल्याचे आमदार असताना त्यांनी कुडाळ शहराजवळ ‘ एमआयडीसी ‘च्या माध्यमातून अनेक लहान मोठे उद्योग आणले.तरुण – तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.मात्र काही वर्षातच या उद्योगांना घरघर लागली.त्यात राजकीय हेव्यादाव्यामुळे निसर्गरम्य सिंधुदुर्गात मोठे – मध्यम उद्योग नको.लघु उद्योग ,कुटिरोद्योग हवेत अशा आग्रहातून आहे त्या उद्योगांकडे ,त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि हळू हळू एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडत गेले.बघता बघता या उद्योगनगरीला अवकळा आली.या एम आय डी सी तून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता हे आताच्या तरुण तरुणींना सांगीतलं तर खरंच वाटणार नाही.कारखाने बंद पडले आणि कुडाळ शहर आणि आसपासच्या परिसराची रयाच गेली.एकेकाळी गजबजलेलं असणार असं हे कुडाळ एकदम शांत झालं. इथली धावपळ थांबली. कुडाळ शहराच्या आठवणी सांगताना इथल्या जुन्या जाणत्या व्यापाऱ्यांचा, बुजुर्ग मडळींचा कंठ दाटून येतो. ‘गेले ते दिन गेले ‘ हेच उद्गार त्यांच्या तोंडून निघतात. ही ‘एमआयडीसी’ पुनरुज्जीवीत व्हावी यासाठी अनेकांनी अनेक प्रयत्न केले. मधल्या काळात काही उद्योग आले आणि काही कालावधीत बंदही पडले. आजही ‘अतिरिक्त एमआयडीसी’त उद्योग येताहेत, यापुढेही ते येतील, तरुणांना कायमचा रोजगार मिळेल याच आशेवर इथले तरुण -तरुणी आहेत. पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर या जिल्ह्याचं रुपडंच पालटून जाईल असं आम्हाला वाटलं होतं पण याही बाबतीत निराशाच झाली.याला कारणीभूत आमची मानसिकता, आमचा करंटेपणा. आम्हाला ‘Sea World’ नको, मालवणच्या खोल समुद्रातल्या ‘ ‘Marine sanctuary’ सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन प्रकल्पांना आमचा विरोध. परदेशी पर्यटक जे कपडे घालतात त्यानं आमची संस्कृती बिघडते…! मात्र ओरड करणारी हीच मंडळी मात्र सिंगापूर, मलेशिया, थायलंड किंवा अन्य देशांमध्ये भटकंती करून येतात, तेव्हा मात्र आमची संस्कृती बिघडत नाही. हा दांभिकपणा जोपर्यंत आम्ही सोडत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा पर्यटन विकास कधीच होणार नाही. आमचे समुद्र किनारे गोव्यापेक्षा स्वच्छ आणि सुंदर आहेत अशी शेखी आम्ही मिरवतो पण त्या समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना आपण कोणत्या सोयी – सुविधा निर्माण केल्या हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. काही ठिकाणी तर चहा -कॉफी सोडाच साधी पाण्याची बाटलीही मिळत नाही ही शोकांतिका आहे. आज गोव्यात दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख पर्यटक येतात.त्यापैकी सुमारे ८-१० लाख विदेशी पर्यटक असतात. युरोप,रशिया इथून पर्यटन हंगामात अनेक चार्टर्ड विमानं येतात. केरळ राज्य, दक्षिणेकडची अन्य राज्ये आज पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करू लागली आहेत. गोव्याच्या बरोबरीनं केरळनंही पर्यटन क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आज गोव्यात खाण उद्योग,अन्य उद्योग,फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत.मात्र गोव्याचं अर्थकारण हे पर्यटनावर अवलंबून आहे. एक पर्यटक जेव्हा येतो तेव्हा ११ते १२ जणांना प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोव्यातल्या लोकांनी ‘पर्यटन हीच आपली रोजी-रोटी’ समजून ते केव्हाच स्वीकारलं आहे व पर्यटन विकासाचा ध्यास घेतला आहे. दरवर्षी हॉटेल्स वाढताहेत, दळण- वळणाची साधनं वाढताहेत.आज गोव्याचं दरडोई उत्पन्न सव्वा चार लाख आहे. त्याखालोखाल सिक्कीम आणि नवी दिल्लीचा नंबर लागतो जो सिंधुदुर्गच्या कितीतरी पटीनं अधिक आहे याचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार केला पाहिजे.…