Month: August 2024

 जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत पशुसंवर्धन पंधरवडा

पंचसूत्रीची अंमलबजावणी   ठाणे : पंचसुत्रीच्या संदर्भात पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच या पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४’ राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. वल्लभ जोशी तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर,  यांनी दिली आहे. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुवैद्याकीय संस्थामार्फत पशुधनाचा प्रादूर्भावापासून साथ रोग बचाव होण्याकरिता पशुधनास लाळखुरकुत, सांसर्गिक गर्भपात, लम्पीचर्मरोग, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार इ. रोगांचे लसीकरण तसेच पशुमधील जंत निर्मुलन करण्यासाठी जंतनाशक औषधींचे वाटप, गोचीड गोमाशा निर्मुलनासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गाई म्हशींची वंधत्व तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती, पशुधनाच्या सकस आहाराचे महत्त्व तसेच सप्टेंबर २०२४ पासून चालू होणाऱ्या २१ व्या पशुगणनेच्या अनुषंगाने माहिती तसेच मार्गदर्शन करण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा. राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत आहे. त्यासाठी विभागाकडून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व पशुधनास बाबत २७ फेब्रुवारीला शासनाने सूचना निर्गमित केल्या असून जिल्हाधिकारी यांनी ठाणे जिल्ह्यात सर्व जनावरांना टॅगिंग करणे बाबत आदेश दिले आहेत, त्यानुसार अनावधानाने राहिलेले अथवा नवीन जन्म घेतलेली जनावरे यांना सुद्धा पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन tagging करून घ्यावे. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुका लघुपशु वैद्यकीय, सर्व चिकित्सालय एक, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी १ मधील २२ व श्रेणी २ मधील ४२ असे एकूण ६९ संस्था कार्यरत आहेत. चौकट ६ ऑगस्ट व ७ ऑगस्ट रोजी कार्यशाळा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात ६ ऑगस्ट आणि ७ ऑगस्ट या दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा ही रोटरी कम्युनिटी क्लब, वडवली, अंबरनाथ या ठिकाणी सकाळी ९:३० वाजता आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेचे तपशील, बारकावे व योजनेचा अर्ज कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ज्या लाभार्थ्यांनी पूर्ण केली आहे किंवा जे लाभार्थी यशस्वीरित्या शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत त्यांचे स्वः अनुभव व मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये करण्यात येणार आहेत. पशुपालकांनी कार्यशाळेत नोंदणी करण्यासाठी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुक्यातील पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

अविनाश धर्मधिकारी यांनी दिलेल्या सूचना आत्मसात करा-रामशेठ ठाकूर

अशोक गायकवाड     पनवेल : आपला देश विविध संस्कृतीने भरला आहे आणि या देशाचा सुजाण नागरिक होणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा बलाढ्य भारत आहे, त्यामुळे प्रत्येक तरुणाने त्याची जाणीव ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे. विज्ञान पुढे जात आहे आणि त्यानुसार काळ बदलत आहे. त्यामुळे आपण निवडलेले क्षेत्र हे जीवनाला दिशा देणारे असले पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्या आणि कुटुंबासोबत देशही महत्वाचा आहे त्या अनुषंगाने अविनाश धर्मधिकारी यांनी आपल्या अमूल्य मार्गदर्शनातून दिलेल्या सूचना आत्मसात करा, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात केले. आयुष्य घडविण्यासाठी संकल्प महत्वपूर्ण असते. त्यामुळे स्वतः ची ओळख, आवडते क्षेत्र आणि उत्तम व प्रतिभावंत होणे ही त्रिसूत्र अंगिकारा, अशी मार्गदर्शक सूचना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी खांदा कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात विदयार्थ्यांना केली. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालय (स्वायत्त) आणि सी. डी. देशमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना “१० वी, १२ वी नंतरच्या करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्व विकास” या विषयावर ‘मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम’ त्याचबरोबरीने पाचवी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून ‘भव्य रोजगार मेळावा’ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर उच्च महाविद्यालयात पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमांना प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारिणी सदस्य अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्राचार्य एस. के. पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे, विकास घरत, प्रवीण पाटील,विजय चिपळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा राजेश्री वावेकर, कामगारनेते जितेंद्र घरत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, ऍड. चेतन जाधव, प्रदीप भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, आदी मान्यवर उपस्थित होते. अविनाश धर्माधिकारी यांनी पुढे बोलताना सांगितले कि, नमस्कार आणि सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा हि जीवनातील दोन मंत्र आहेत. समोरच्या व्यक्तीला नमस्कार केल्याने आपल्यात आणि त्या व्यक्तीमध्ये ईश्वरी चैतन्य निर्माण होते तर दुसऱ्या मंत्रामुळे सर्व विश्वाचे कल्याण करण्याची शक्ती मिळते. सर्व विश्वाचे कल्याण करणारी आपली भारतीय संस्कृती आहे आणि जगाला कल्याणाची शिकवण आपल्या देशाने दिली आहे. संकल्प आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम करते आपण जसे व्यक्तिमत्व घडवू तसा जीवनाला आकार येते. माणूस म्हणून आपल्याला सन्मानाने जगता आले पाहिजे आणि त्यासाठीही संकल्प महत्वाचा असतो. सर्व करिअर चांगले आणि समान असतात, फक्त त्याची निवड आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार करणेही तेवढेच गरजेचे असते. आणि हे करताना बदलता काळही लक्षात घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षणातून करिअर करताना भारतमातेची सेवा झाली पाहिजे हेही आपल्या मनात रुजले पाहिजे आणि त्या अनुषंगाने केलेली वाटचाल मार्गदर्शक ठरणार आहे. जगात दिवसेंदिवस बदल घडत आहे आणि पुढील सहा वर्षात एआय विज्ञान क्षेत्रामुळे प्रचंड बदल होणार आहे. आणि तसा त्याचा परिणाम होणार आहे. एआय मुळे रोजगार कमी होणार असले तरी त्या क्षेत्रातील रोजगारांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे त्याचाही वेध घेत त्यामध्येही करिअरची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान बदलेल संधी बदलतील मात्र स्पर्धा परीक्षा कायम राहतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहनही त्यांनी करत सीकेटी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, अटल सेतू, आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीएमुळे आगामी पाच वर्षाच्या काळात या परिसरात जगातील विविध प्रकल्प येणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या अनेक विद्यापीठातून विविध शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि त्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांना संधीचे द्वार उपलब्ध होणार आहे. त्यानुसार परिसरात येणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी विद्यार्थांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख जे. एम. पावरा यांनी केले. युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गर्शनाखाली झालेल्या ‘भव्य रोजगार मेळावा’ मध्ये १८२८ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील रिलायन्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा स्ट्राईव्ह, गुगल पे, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय बँक, ओला, युरेका फॉर्ब्स, एलआयसी, फोन पे, डॉ. रेड्डी फाऊंडेशन, जिओ अशा नामांकित ६० कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी काही पात्र उमेदवारांना ‘ऑन दि स्पॉट अपॉईंटमेंट लेटर’ लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्राचार्य एस. के. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 0000

अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देणार – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर   अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरकडून ग्राहकांची फसवणुक होऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने दक्षता घेणे गरजेचे आहे. याबाबत मंगळवारी ठाणे पालिका आयुक्तांच्या दालनात आयुक्त, वास्तूविशारद व ग्राहक प्रतिनिधींबरोबर बैठकीचे आयोजन केलेले आहे जेणेकरून अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या सर्व ग्राहकांना न्याय मिळवून देणार असल्याची माहिती स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये विवियाना मॉल शेजारी अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरचे अनेक विकास प्रकल्प असून त्यामध्ये ज्युरी नावाच्या गृहप्रकल्पाचा देखील समावेश आहे. सन २०१६ मध्ये अश्विन शेठ ग्रुप बिल्डरने हा प्रकल्प लॉन्च केला असून बहुतांश घरे ही मध्यमवर्गीय ग्राहकांना विकली गेलेली आहेत. यामध्ये २८ माळ्याचे  ३ टॉवर असून ६ विंग आहेत. प्रत्येक माळ्यावर ४ फ्लॅट आहेत.  सन २०१७ मध्ये रेरा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अश्विन शेठ ग्रुप बिल्डरने ग्राहकांना डिसेंबर २०२२ ही पजेशनची अंतीम तारीख दिली होती. परंतू, सन २०२४ उजाडले तरी अद्यापपर्यंत या शेकडो ग्राहकांना घरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अश्विन शेठ ग्रुप बिल्डरच्या पार्ले येथील व्यावसायिक कार्यालयावर व ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे तेथील कार्यालयावर हे सर्व ग्राहक दर शनिवार-रविवार रूमचे पजेशन मागण्यासाठी जात होती परंतू, या सर्व ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसली जात होती.काही ग्राहकांच्या मतानुसार अश्विन शेठ ग्रुप बिल्डरच्या विकास प्रकल्पाला बांधकाम नकाशे मंजूर नसतानाही घरे विकली गेलेली आहेत. तसेच ग्राहकांना रूम बुकिंग करताना घर वेगळे दाखविले परंतू, पजेशन देताना मात्र वेगळ्याच ठिकाणी घरे देत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्राहकांच्या प्रतिनिधींनी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली. ३ ऑगस्ट, २०२४ रोजी अश्विन शेठ ग्रुप या बिल्डरकडून सर्व ग्राहकांना साईटवर बोलाविले असता विकासकाच्या वतीने त्यांच्या एच.आर. डिपार्टमेंटने पजेशन आता यावर्षी न देता सन २०२५ मध्ये देऊ, असे सांगितले. त्यामुळे सर्व ग्राहक भडकले व बिल्डराच्या विरोधामध्ये नारे लावायला लागले. यावेळी ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला होता. १५० ते २०० ग्राहकांच्या जमावाने बिल्डरांच्या कर्मचार्यांना घेराव घातला त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता त्यावेळी विकासकांनी पोलिसांना बोलाविले. हे मुख्यमंत्र्यांचे ठाणे असून या परिसराचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिनिधीत्व करीत असतील व या ठिकाणी ९० टक्यांपेक्षा अधिक ग्राहक महाराष्ट्रीयन असतील तर ठाण्यामध्ये विकासकांकडून ग्राहकांची फसवणुक करण्याची हिंमत कशी काय होते, असे ग्राहकांनी सांगितले. ही सर्व घटना स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना कळताच ह्या प्रकल्पाच्या जागेवर जाऊन या प्रकल्पाचे वास्तुविशारद प्रवीण जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मतदारसंघातील प्रकल्पांमध्ये कुणाची फसवणुक होऊ देणार नाही असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यासाठी महापालिकेने दक्षता घेणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी ठाणे मनपा आयुक्तांशी चर्चा करून मंगळवारी, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२ वाजता आयुक्तांच्या दालनात वास्तूविशारद व ग्राहकांच्या प्रतिनिधींबरोबर एका बैठकीचे आयोजन केलेले आहे, जेणेकरून अश्विन शेठ ग्रुप बिल्डरकडून फसवणुक झालेल्या सर्व ग्राहकांना लवकरात लवकर न्याय मिळू शकेल. 00000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा ०७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा!

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी, ०७ ऑगस्टला…

आज पनवेलमध्ये ‘भजन स्वरपुष्प’

पनवेल : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नादब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ ऑगस्ट रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे मंजुषा पाटील यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभांतर्गत मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात हा कार्यक्रम रविवार दिनांक…

बीओबी कप १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा  ११ ऑगस्टला 

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षाखालील मुलामुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्ट रोजी आरएमएमएस सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे होणार आहे. आयडियल…

‘राष्ट्रीय समूह गान’स्पर्धेत एसपीएमच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

मुंबई :  भारत विकास परिषद, कोथरूड शाखा, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा ‘ ही महर्षी स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे’ येथे ०३ ऑगस्टला संपन्न झाली. या स्पर्धेत आपल्या ‘शिक्षण…

मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना जाहीर आवाहन

मुंबई : मराठा मंडळ मुलुंड या आमच्या मान्यवर संस्थेतर्फे दरवर्षी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले जातात. मंडळातर्फे येत्या १० ऑगस्ट रोजी, शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता मुलुंडमधील गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांकरीता…

मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी परिसरातील विशेष तपासणी शिबीरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई- सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असून हिवताप / डेंग्यू सारख्या किटकजन्य आजाराच्या डासांकरिता पोषक वातावरण तयार झाले आहे. हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्याकरिता आणखी ठोस उपाययोजना राबविण्याच्या…