11 लाख ‘लखपती दिदींना’ प्रधानमंत्री यांच्याकडून प्रमाणपत्र
जळगावात 25 ऑगस्ट रोजी सोहळा मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला महाराष्ट्राच्या दौ-यावर येत आहेत. या दौ-या दरम्यान जळगाव येथे 11 लाख दिदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून श्री.मोदी त्यांचा सत्कार करतील. ज्या कष्टाळू महिलांनी स्व:बळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमावले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबीयाना गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दिदींचा प्रधानमंत्री .मोदी सन्मान करतील, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमात प्रधानमंत्री 2500 कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि 5000 कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे श्री चौहान यांनी सांगितले. यामुळे 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना तसेच 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना लाभ होईल. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच 1 कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी 3 वर्षांत 3 कोटी लखपती दिदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. 15 लाख नवीन लखपती दिदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील 1,04,520 लखपती दिदींचा समावेश आहे. ००००