जुन्या ई रिक्षा शासकीय खात्यांना सुपूर्द करा
स्थानिकांची मागणी माथेरान : माथेरान मधील एकूण ९४ पैकी वीस हातरीक्षा श्रमिकांच्या हाती १० जूनपासून सहा महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टवर पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्याने सुरुवातीला नगरपरिषदेच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या सात ई रिक्षा बंद करण्यात आल्या असून त्या सर्व ई रिक्षा शास्त्री हॉलमध्ये ठेवण्यात आल्या असून त्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अजूनही काही दिवस त्या बंद ठेवण्यात आल्या तर आगामी काळात नादुरुस्त होऊन भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गावातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गाला नगरपरिषदेने भाडेतत्त्वावर दिल्यास त्याचा सदुपयोग होऊ शकतो आणि याच माध्यमातून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. ई रिक्षा सुरू झाल्यापासूनच खऱ्या अर्थाने इकडे पर्यटकांना लोंढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि त्यातच ऐन गर्दीच्या वेळी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग मध्येच येऊन रिक्षात बसून जातात त्यामुळे अनेकदा त्याठिकाणी रिक्षा स्टँडवर पर्यटक संबंधित रिक्षाच्या कर्मचाऱ्यासोबत वाद घालताना दिसतात. बहुतेक खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग हे मोफतच ह्या सेवेचा लाभ घेत आहेत. येथील श्रमिकांनी कर्ज काढून या ई रिक्षा घेतलेल्या आहेत त्यातच शासकीय वर्गाला मोफत सेवा उपलब्ध करून दिल्यास ह्या श्रमिकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यासाठी नगरपरिषदेने येथील सर्व शासकीय खात्याला या जुन्या सात रिक्षा मासिक भाडेतत्त्वावर दिल्यास यातून नगरपरिषदेच्या तिजोरीत भर पडून या जुन्या सात रिक्षांची देखभाल राहू शकते असेही बोलले जात आहे. 00000