कर्जत : कर्जतचे नांव ‘पुस्तकाचे गाव’ मध्ये समाविष्ठ करा, असे कर्जत जि.रायगड मधील साहित्यप्रेमी व्यक्ती व जागृत पत्रकार व विविध संस्थाना विनम्र आवाहन दिलीप प्रभाकर गडकरी यांनी केले आहे. वेल्समधील ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी ही योजना अमलात आणली.या अंतर्गत सातारा जिल्यातील वाई तालुक्यातील भिलार येथे पहिले पुस्तकांचे गाव आकारास आले. या संकल्पनेचे मराठी भाषाप्रेमी , साहित्यिक ,लेखक , पर्यटक या सर्वांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आल्याने आता या योजनेचा विस्तार करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने ठरवल्याचे मराठी भाषा खात्याचे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी पत्रकारांना सांगितले. यानुसार पुणे महसूल विभागातून औदुंबर जि.सांगली ,औरंगाबाद विभागातून वेरूळ जि.औरंगाबाद , नागपूर विभागातून नवेगाव बांध जि.गोंदिया आणि कोकण विभागातून पोंभुर्ले जि.सिंधुदुर्ग या चार गावांची निवड करण्यात आली आहे.या गावांना साहित्याची पार्श्वभूमी आहे असे म्हणतात. या गावांच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील मुंबई पुण्याच्या मध्यावर असलेले कर्जत सुध्दा या पंक्तीत बसू शकते. कर्जत शहराच्या मध्यभागी असलेली जीवन शिक्षण मंदिर ही शाळा १८९४ साली सुरू झाली.१२८ वर्ष पूर्ण केलेल्या हया शाळेत राम गणेश गडकरी, र.वा.दिघे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे शिक्षण झाले आहे.सध्या रायगड जिल्हापरिषदेच्या ताब्यात असलेल्या हया शाळेत दहा खोल्या असून राम गणेश गडकरी सभागृह नावाचा हॉल आहे.हया शाळेत पहिली ते सातवी पर्यंत अवघे चाळीस विद्यार्थी आहेत.त्यांची इतरत्र सोय करून पुस्तकाचे गाव या योजनेअंर्तगत विविध प्रकारच्या साहित्य , कथा , कादंबरी , आत्मचरित्र , प्रवासवर्णनपर ग्रंथांनी सुसज्य अशी भव्यदिव्य दालने कमीतकमी खर्चात उभी करणे शक्य आहे. ह्याच भागात असलेल्या सभागृहाचा वापर प्रदर्शन भरवणे , व्याख्याने आयोजित करणे इत्यादी कामासाठी होऊ शकेल.शासनाने हा उपक्रम थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२८ वर्षाच्या जुन्या ऐतिहासिक वास्तूत राबवला तर हया तीन महान साहित्यिकांचे एकत्रित भव्य स्मारक उभे राहील आणि साहित्यप्रेमींच्यासाठी विशेष आकर्षण ठरून महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या गावात कर्जतच्या गावाचा नंबर वरचा राहील यात शंकाच नाही. कर्जत शहर हे मुंबई-पुणे यांच्या मध्यभागी असल्याने पर्यटकांना रेल्वेने अथवा रस्त्याने प्रवास करणे सोयीचे ठरेल. यापूर्वी कर्जत येथे अनेक साहित्यिक उपक्रम राबवले गेले. अभिनव ज्ञान मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर वारे यांच्या प्रयत्नाने अडीच हजार विद्यार्थांचे बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. साहित्यप्रेमींनतर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, नारायण सुर्वे, वि.आ.बुवा, रामदास फुटाणे, प्रवीण दवणे,गिरिजा कीर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे इत्यादी अनेक साहित्यिकांना निमंत्रित केले होते.कर्जतमध्ये राम गणेश गडकरी , र.वा.दिघे , प्रबोधनकार ठाकरे , चि.त्र्यं. खानोलकर ह्यांचे काही काळ वास्तव्य होतेच परंतु स्थानिक साहित्यिकांनी सुध्दा कर्जतचे नांव उज्वल केले आहे. कै.गजानन रघुनाथ मुळे ,मोरेश्वर शास्त्री काळे , श्री सदाशिव रहातेकर यांनी संस्कृत भाषेतील साहित्याचे मराठीत भाषांतर करून मराठी साहित्यात भर घातली. पद्माकर वैद्य , श्री वसंतराव जोशी , अँड.गोपाळ शेळके , साहेबराव गायकवाड , बबन गायकवाड , कवी अशोक अभंगे , शीघ्र कवी चंद्रकांत कडू , डॉ.विलासीनी आरेकर , प्रा.डॉ.नितीन आरेकर , अनुपमा कुळकर्णी, मृदुला गडणीस, मीरा वैद्य , पद्मा कुलकर्णी इत्यादी अनेक साहित्यिकांनी कर्जतचे नांव उज्वल केले आहे.…