मुंबई : मनुष्याने इहलोकीची यात्रा संपविल्यानंतर त्याला अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरुन नेण्याची परंपरा आहे. कालानुरूप त्यात बदल करण्यात आला. रुग्णवाहिका/शववाहिकेतून पार्थिव नेण्यात येऊ लागले. लाकडाऐवजी विद्युत शवदाहिनी चा वापर सुरु झाला. ग्रामीण भागात काही ठिकाणी पार्थिव पालखीतून नेण्यात येते. परंतु पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावच्या लोकांनी मृत व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी स्वर्गरथाची कल्पना पुढे आणली. लोकवर्गणीतून हा स्वर्गरथ तयार करवून घेतला. पाटील हायटेक इंजीनियरिंग जाधववाडी येथे बनविलेल्या स्वर्गरथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. मनुष्य इहलोकीची यात्रा संपवून थेट स्वर्गारोहण करतो अशी भावना या ग्रामस्थांची आहे. त्यामुळे मृत व्यक्तीचा अखेरचा प्रवास ईश्वरी वातावरणात स्वर्गरथातून व्हावा यासाठी हा अनोखा स्वर्गरथ तयार करण्यात आला असून ‘आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा रामराम घ्यावा’ असेही या स्वर्गरथाच्या शिरोभागी लिहिले आहे. या स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यासाठी थोरांदळे गावचे लोकनियुक्त सरपंच जे. डी. टेमगिरे, बाळासाहेब टेमगिरे, सोपान घुले, ह. भ. प. विलास मिंडे महाराज, गणेश गुंड, डॉ. दत्तात्रय विश्वासराव, लक्ष्मण गुंड, सुरेश टेमगिरे बाळासाहेब घुले, बाळासाहेब विश्वासराव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *