अशोक गायकवाड*

 

अलिबाग : समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.३०) महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबाग शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून महावाचन उत्सव संपन्न करण्यात आला.*
महावाचन उत्सव २०२४ निमित्त अलिबाग शहरातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती जा.र. ह. कन्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ग्रंथदिंडीचे पूजन‌ करण्यात आले. यानंतर‌ विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती या विषयी उपशिक्षण अधिकारी संतोष शेडगे, विचारवंत ऍड. के. डी. पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुभाष म्हात्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संबंधितांनी जीवनात पुस्तके, वर्तमानपत्रे यांचे महत्त्व, वाचनामुळे होणारे फायदे, मोबाईलचा अतिवापर करण्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यानंतर कन्या शाळा ते जिल्हा वाचनालय दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीत वाचनाचे महत्त्व सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. तसेच भारतमाता, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करीत विद्यार्थिंनी सहभागी झाल्या होत्या. तसेच महावाचन उस्तव निमित्त कन्या शाळेत ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले होते. महावाचन उत्सवात प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, माध्यमिक शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे, उपशिक्षण अधिकारी सुनिल भोपळे, विस्तार अधिकारी कल्पना काकडे, गटशिक्षण अधिकारी कृष्णा पिंगळा, कन्या शाळा मुख्याध्यापिका प्रतिभा वेदपाठक, अनिल राऊत, बिपीन राऊत यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी, कन्या शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *