ठाणे : तेरा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या नवऱ्याला घटस्फोट देऊन त्याला दुसरे लग्न करण्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी बाहेरच्या लोकाकडून होणारी मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून मला शांततेने जगू द्यात अशी आर्त विनवणी संगीता शिरोडकर – खामकर या विवाहतेने पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे.
सागर खामकर आणि संगीता शिरोडकर यांचा तेरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर काही दिवसानंतर सासरकडच्या लोकांनी नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून तू खालच्या समाजातील आहेस असे बोलत संगीताकडे तगादा लावला. मुलीच्या जन्मांनंतर सर्व सुरळीत होईल अशी संगीताची अपेक्षा होती. पण तिची निराशाच झाली. गेल्या काही वर्षांमध्ये हा त्रास वाढतच गेल्याने संगीताने महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम २००५ च्याअन्वये न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने संगीताला दिलासा देताना तिला निवास लाभ आणि संरक्षण देण्याचे आदेश दिले. असे असताना मागील २ मार्च रोजी सासू सासऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन संगीता रहात असलेल्या घराचा दरवाजा तोडला. या वेळी त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि तीन हजार रुपयांची रोख रक्कम चोरत तिथे उपस्थित नसलेल्या संगीताच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर सासू सासऱ्या सोबत आलेल्या गुंडामधील काही महिला बळजबरीने आत येत घराचा अवैध कब्जा घेतला. त्यातील चार महिला आळीपाळीने सकाळ संध्याकाळ घरात बसून असतात. या महिला काहीवेळ मारहाण करीत असल्यामुळे संगीताने पोलिसांकडे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अन्वये फिर्याद दाखल केली. पण पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यामुळे ठाण्यातील विशेष सत्र न्यायालयात सासरच्या लोकांविरुद्ध दाखल केली. त्यावर न्यायालयाने संगीताच्या तक्रारीची पडताळणी करत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यावर पोलिसांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियानुसार सासरकडच्या लोकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण त्यांनतरही संगीताची होणारी छळवणूक आणि मानसिक मानहानी थांबलेली नाही.संगीताने यासंदर्भात राज्य महिला आयोग आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार नोंदवली. यावर या दोन्ही आयोगाकडून येणाऱ्या निर्देशाकडे पोलीस कानाडोळा करत असल्याचा आरोप संगीताने केला आहे. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून माझा नवरा, मुलीसह शांततेने जगू द्यात अशी याचना पत्रकारांशी संवाद साधताना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *