पुणे : सध्या देशाच्या एका बाजूला असना वादळ घोंगावत असून, दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे हवामान खात्याने मध्य भारतात जोरदार पावसाचा इशारा दिला असून, सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दोन दिवस पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती, पण आता पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
सध्या असना वादळामुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य भारतामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि बिहार राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच लडाख, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो.
राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, तर पंजाब आणि हरयाणाच्या काही भागात पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तेलंगणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज दिला आहे.
